मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहानमोठ्या सर्वांना आकर्षित करणारी ‘वनराणी‘ ही मिनी टॉय ट्रेन आता पुन्हा सुरू होणार आहे. मे २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती. दरम्यान, सध्या या टॉय ट्रेनवर काम सुरू असून ऑगस्ट २०२५ पर्यंत ‘वनराणी’ पर्यटकांच्या सवेत रुजू होईल अशी माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.

उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’विषयी पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. ‘वनराणी’ या छोट्या रेल्वेमधून उद्यानाची सफर करण्याची मजा मुलांबरोबरच त्यांचे पालकही भरभरून लुटत असत. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली, अनेक रस्ते उखडले गेले. त्यावेळी वनराणीच्या २.३ किमीच्या वळणदार मार्गावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही प्रचंड नुकसान झाले होते. वनराणीची धाव तेव्हापासून बंद झाली. वनराणी नव्याने सुरु करण्यासाठी २.३ किमीचा रेल्वे मार्ग पूर्णतः नव्याने बांधावा लागणार होता. दरम्यान, या प्रकल्पासाठी आता अखेरीस निधी मिळाल्याने वनराणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पाच वर्षांनी, ऑगस्ट २०२५ पर्यंत वनराणी पुन्हा नव्याने पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून समुद्रात मारली उडी, शोधमोहिम सुरू

टॉय ट्रेनच्या मार्गावरील जुने रुळ आणि स्लीपर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. बांधकामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन रूळ बसवण्यात येतील. हे काम रेल इंडिया टेक्निकल ॲंड इकोनॉमिक सर्व्हिसद्वारे करण्यात येत आहे. दरम्यान यापूर्वी डिझेल इंजिनवर चालणारी गाडी आता विजेवर चालवली जाणार आहे. त्यात चार डबे असतील. मार्गावरील स्थानकांचे तसेच मार्गावरील कृत्रिम बोगद्याचेही नूतनीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा – Coldplay Ticket : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी बुक माय शोच्या सीईओंना दोनवेळा नोटीस; पण हजर झाले दुसरेच अधिकारी!

सन १९७४ मध्ये राष्ट्रीय उद्यानात वनराणी सुरू झाली. वनराणीच्या माध्यमातून उद्यानास दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल मिळायचा. आकर्षक, छोटेखानी इंजिन आणि त्याला जोडलेले चार खुले डबे अशी रचना असलेली वनराणी उद्यानाच्या झाडीतून धावताना जंगलाचे सौंदर्य दाखवायची. गाडीच्या प्रत्येक डब्यात १६ प्रमाणे ६४ प्रवासी एकावेळी या गाडीतून सैर करायचे. साधारण ३० मिनिटांची फेरी होती. आता नव्याने विजेवर धावणारी वनराणी सज्ज होत आहे.