पालिकेच्या के ई एम रुग्णालयातील एक उदवाहक गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. उदवाहनाची देखभाल करणाऱ्या कंपनीचा आणि रुग्णालय प्रशासनाचा देयकावरून काही वाद असल्यामुळे हे उदवाहक दुरुस्त करत नसल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. तसेच या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
के ई एम रुग्णालयाच्या सीव्हीटीसी इमारतीत दोन उदवाहक असून त्यापैकी एक उदवाहक बंद आहे. हे उदवाहक खूप दिवसापासून बंद आहे. यासंदर्भात माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी के ई एम हॉस्पिटलयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांची भेट घेऊन तक्रार केली. दरम्यान, देखभाल करणारी कंपनी उदवाहक बंद ठेवत असल्याचा आरोप पडवळ यांनी केला आहे.
कंपनीने आपल्या देयकासाठी रुग्णांना वेठीस धरले –
उदवाहक प्रसिद्ध कंपनीचे असून त्यांचे परीक्षण करण्याचे काम देखील त्यांना देण्यात आले आहे. त्याची देयके देखील प्रशासन अदा करीत आहे. परंतु या देयकावरून त्यांचा प्रशासनाशी काही वाद आहे. त्या वादामुळे ही कंपनी उदवाहक जाणून बुजून बंद करते आहे. तसेच कंपनीचा प्रतिनिधी नेहमी येऊन त्यांच्या ताब्यात असलेल्या सीव्हीटीसी इमारतीच्या गच्चीवरील केबिनमध्ये जाऊन प्रशासनाने सुरू केलेले उदवाहक बंद करतो, असाही आरोप पडवळ यांनी केला आहे. तसेच, कंपनीने आपल्या देयकासाठी रुग्णांना वेठीस धरले आहे., असे पडवळ यांनी सांगितले.
कंपनीच्या प्रतिनिधीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा –
पडवळ व स्थानिक नगरसेविका सिंधू मसुरकर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर, कंपनीच्या प्रतिनिधीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व उदवाहक कायमस्वरूपी नियमित चालू ठेवण्याचे आदेश कंपनीला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.