लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून मुंबईकर वातावरणातील उष्णतेने हैराण झाले आहेत. परिणामी, पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मिळून केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा काही प्रमाणात अधिक असला तरीही उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाण्याची वाढती गरज आणि उन्हामुळे झपाट्याने होणारे बाष्पीभवन आदींमुळे धरणांतील घटणारा पाणीसाठा मुंबईकरांची जलचिंता वाढवत आहे.
मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी असून सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ३ लाख ६५ हजार ८८३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी २८ एप्रिल रोजी सकाळी ६ पर्यंत २ लाख ८९ हजार ३९४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची नोंद झाली होती. मात्र, यंदा उष्णतेच्या तीव्रतेचा प्रचंड वाढ झाल्यामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे.
तसेच, झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी सुरु असलेली पाण्याची उधळपट्टी, वारंवार घडणाऱ्या जलवाहिन्यांच्या गळतीच्या घटना, अनेक ठिकाणी सुरु असलेल्या पाण्याचा अमर्याद वापर यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून उष्णतेच्या तीव्रतेमुळे मुंबईकरांच्या अंगाची काहिली होत आहे. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून पाण्याची गरजही वाढली आहे.
दरम्यान, अनेक भागांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामांवरही परिणाम होऊ लागला आहे. अशातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे मुंबईकरांची जलचिंता वाढली आहे. सात धरणांमध्ये मिळून एकूण २५.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हा साठा १९.९९ टक्क्यांवर पोहोचला होता. सद्यस्थितीत सर्वाधिक म्हणजेच ३७.३० टक्के पाणीसाठा तुळशी तलावात असून तानसामध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच २०.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
ऊर्ध्व वैतरणा धरणात २३.०१, मोडकसागरमध्ये २५.४३, मध्य वैतरणामध्ये २९.७३, भातसामध्ये २५.०८, विहारमध्ये ३७.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, २८ एप्रिल रोजी सकाळी ६ पर्यंत २०२४ या वर्षात १९.९९, तर २०२३ मध्ये २६.१५ टक्के पाण्याची नोंद झाली होती.
तीन वर्षांतील पाणीसाठा
वर्ष | शिल्लक पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये) |
२०२५ | ३६५८८३ |
२०२४ | २८९३९४ |
२०२३ | ३७८४७५ |