Mumbai Water Cut Timings : मुंबईकरांना पाच दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) शनिवारी १ ते ५ डिसेंबर या कालावधीत शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली जाईल अशी घोषणा केली आहे.
मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममध्ये ३० नोव्हेंबर रोजी बिघाड झाला आहे. या गेटच्या दुरुस्तीचे काम १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत केले जाणार आहे. त्यामुळे ही पाणी कपात केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून होणार्या पाणी कपातीचा ठाणे आणि भिवंडी या महापालिकांनादेखील फटका बसणार आहे. १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या काळात या महापालिकांमध्ये देखील १० टक्के पाणी कपात केली जाईल. या कालावधीत पाणी जपून वापरावे आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनदेखील महापालिकेच्या निवेदनात करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात महापालिकेने १७ ते १८ ऑक्टोबर यादरम्यान मुंबईत ५ ते १० टक्के पाणी कपातीची घोषणा केली होती, यावेळी ठाणे जिल्ह्यातील पाईपलाईनवरील व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात आले होते. मुंबई महापालिकेने निवेदन जारी करत वैतरणा पाईपलाईनवरील तराळी येथे ९०० एमएम व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने पाणी पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आल्याचे सांगितले होते. मुंबई शहर आणि उपनगर भागांना होणारा पाणी पुरवठा हा वैतरणा धरणातून केला जातो.
मुंबईत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यावरून भाजपाने काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले होते. गेल्या १० वर्षांत महापालीकेने एकही नवीन धरण बांधले नाही किंवा इतर कुठली पर्यायी व्यवस्था उभी केली नाही. उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द करून समुद्रातील पाणी डिसेलिनेट करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला, पण तो देखील पूर्ण होऊ शकला नाही, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अविभाजित शिवसेनेचे १९९७ ते २०२२ या काळात सलग २५ वर्षे मुंबई महापालिकेवर नियंत्रण होते. पण विशेष बाब म्हणजे यापैकी बराचसा काळ शेलार यांचा भाजपा पक्षदेखील शिवसेनेचा सहकारी पक्ष होता.
हेही वाचा>> “माजी सरन्यायाधीश चंदचुडांनी देशात आग लावली”, महाराष्ट्र व संभलचं उदाहरण देत ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप
१९९० च्या दशकात माधवराव चितळे यांच्या नेतृत्वाखालील समितीने मुंबईसाठी गारगाई, पिंजाळ आणि मध्य वैतरणा अशी तीन नवीन धरणे बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. मध्य वैतरणा हे २०१४ मध्ये पूर्ण झाले, पण त्यानंतर नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला नाही, असेही शेलार म्हणाले होते. गारगाई धरणाच्या नियोजनाच्या परवानगीचे काम सुरू झाले होते, पण ठाकरे पर्यावरणमंत्री असताना हा प्रकल्प रद्द करण्यात आला. तसेच कंत्राटदारांच्या फायद्यासाठी ४,४०० कोटी रुपये खर्च करून डिसॅलिनेशन प्रकल्प सुरू करण्यात आला, ज्याचा खर्च नंतर ८,००० कोटी रूपयांपर्यंत वाढला, असा आरोपही भाजपा नेते शेलार यांनी केला.