मुंबई : मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केलेली राखीव पाणी साठ्याची मागणी मंजूर झाली आहे. उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गेल्यावर्षीही मुंबई महापालिकेने राखीव साठ्याची मागणी केली होती.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणातील मिळून एकूण पाणीसाठा वेगाने खालावत असून सातही धरणात मिळून सध्या केवळ ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा जास्त असला तरी जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. मुंबईत आतापासूनच अनेक ठिकाणी पाण्याचा दाब कमी असून काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी वेळ होतो. त्यातच पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने मार्च महिन्यातच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली होती. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे. महापालिकेची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

राखीव साठ्यासाठी मोबदला द्यावा लागणार

राखीव साठ्याचे पाणी घेतले तरी त्यासाठीचा मोबदला मुंबई महानगरपालिका प्रशासनाला राज्य सरकारकडे जमा करावा लागतो. जेवढे पाणी वापरले त्या तुलनेत हा मोबदला द्यावा लागतो. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेने राखीव साठ्याची मागणी केली होती. जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. तेव्हा राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला होता. गेल्यावर्षी भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर तर उर्ध्व वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्षलिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी उर्ध्व वैतरणा धरणातून ४८४२० पाणी वापरण्यात आले होते. त्याबदल्यात ३९.४३ कोटी रुपये मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे यंदाही किती वापर होईल त्यानुसार पाण्याचा खर्च द्यावा लागणार आहे.

यंदा किती पाण्याची मागणी

राज्य सरकारच्या मालकीच्या उर्ध्व वैतरणा आणि भातसा या दोन धरणातील राखीव साठ्याची मागणी मुंबई महापालिकेने केली आहे. उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्षलीटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्षलीटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. यंदाही मागणी केली असली तरी जेव्हा गरज लागेल तेव्हाच त्याचा वापर सुरू केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.