मुंबई : टँकरचालकांच्या संपाचा दुसऱ्या दिवशी मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि विकासकामांना फटका बसला. तसेच सागरी किनारा मार्गाची काही कामेही या संपामुळे रखडली.

वांद्रे पूर्व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून टँकर मिळत नसल्याची माहिती साहित्य सहवासमधील रहिवासी सिद्धार्थ पारधे यांनी दिली. अंधेरी लोखंडवालासारख्या परिसरात काही इमारतींमध्ये मोठ्या सदनिका आहेत. संपामुळे सोसायट्यांनी दोन दिवसांचा साठा केला होता. मात्र संप असाच सुरू राहिला तर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, असे लोखंडवाला रहिवासी संघटनेचे धवल शाह यांनी सांगितले. चांदिवलीतील लिलिअम लॅटना सोसायटीत पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी येथील संघटनेने केली आहे.

विकासकामांनाही फटका

टॅंकरच्या संपाचा विकासकामांनाही फटका बसत आहे. खासगी इमारतींबरोबरच, रस्ते काँक्रीटीकरण, सागरी किनारा मार्गाची कामे, आरएमसी प्लाण्ट यांनाही पाण्याचा पुरवठा शुक्रवारी होऊ शकला नाही.

खासगी विहीर मालकांना भूजल प्राधिकरणाची परवानगी घेण्याबाबचा निर्णय केंद्र सरकारचा आहे. महापालिका फक्त त्याची अंमलबजावणी करीत आहे. त्याकरिता नोटिसा दिलेल्या आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा पुरेसा होत नाही, जलवाहिनी फुटली असेल तर तिथेच पालिकेच्या टॅंकरमार्फत पिण्याचे पाणी दिले जाते. – भूषण गगराणी, मुंबई महापालिका आयुक्त