मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरलेली असताना मुंबईतील अनेक भागांमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत. वडाळ्यातील अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातत्याने तक्रारी करूनही प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संबंधित पालिका विभाग कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरम्यान, पालिकेच्या एफ दक्षिण विभागावर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला. तसेच, वांद्रे, परळ, वडाळा, शिवडी, डोंगरी, गोवंडी – मानखुर्द, महालक्ष्मी, लालबाग आदी परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वडाळ्यातील गणेश नगर, संगम नगर, नेहरू नगर, इंदिरा नगर, कमला नगर, शांती नगर, विजय नगर आदी भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पूर्वी दिवसातून दोनदा पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये आता केवळ रात्रीच्या वेळी एकदाच पाणीपुरवठा होत आहे. वडाळ्यातील बहुतांश भाग झोपडपट्टीने व्यापलेला आहे. परिणामी, तेथे एका नळजोडणीद्वारे सुमारे ४-५ कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील काही दिवसांपासून या भागांत फक्त रात्री एक तास पाणी सोडले जाते. त्यापैकी सुरुवातीची १० ते १५ मिनिटे गढूळ पाणी येते. उर्वरित वेळेत रहिवासी आपापसात तडजोड करून पाणी भरतात. मात्र, ते पुरेसे नसते, असे नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना अटक

मुंबईतील वाढत्या पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त भुषण गगराणी यांची भेट घेतली होती. तसेच, पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची त्यांनी मागणी केली होती. मात्र, अद्यापही मुंबईतील अनेक भागांत अपुरा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray hospitalized : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पाऊस गेल्यावर अवघ्या महिन्याभरात टँकरद्वारे पुरवठा

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरबा मिठागर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत नाही. रात्री १.३० ते ४ दरम्यान पाणी सोडले जाते. पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांवर आता टँकरद्वारे पाणी मागवून तहान भागविण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. त्यामुळे संबंधित पालिका विभाग कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. त्यावेळी पाणीपुरवठा तात्पुरता सुरळीत करण्यात आला होता. मात्र, पुन्हा अवघ्या काही दिवसांत नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे, असे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्या व रहिवासी संगीता जाधव यांनी सांगितले.