मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावाच लागणार आहे.
मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतकी असून आता धरणांत ३ लाख ६१ हजार ८२५ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणी चिंतेने ग्रासले होते. तसेच, धरणांनी तळ गाठल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याच्या पुरवठ्याच्या नियोजनासाठी महानगरपालिकेने ५ जूनपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे, भिवंडी – निजामपूर महानगरपालिका व आसपासच्या गावांनाही ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, धरणांतील पाणीसाठ्यात आता वाढ होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. सध्या सातही धरणांमध्ये एकूण २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
हेही वाचा – हिमोफिलियाच्या औषधाअभावी रुग्णांचे हाल! राज्यात साडेपाच हजार रुग्ण…
मोडकसागर धरणातील पाणीसाठा आता ३७.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, तानसामधील पाणीसाठा ४९.९९ टक्के, मध्य वैतरणातील २३.८९ टक्के, भातसातील २४.६६, विहारमधील ४५.७१, तुळशीतील ६६.२४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
हेही वाचा – घाटकोपर फलक दुर्घटना : ३,३०० पानांचे आरोपपत्र दाखल
दरम्यान, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आजघडीला धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. १३ जुलै २०२२ रोजी धरणांमध्ये ८ लाख ११ हजार ५२२ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा होता. याच दिवशी २०२३ मध्ये धरणांमध्ये ४ लाख १२ हजार ९५७ दशलक्ष लीटर पाणी होते. तर, यंदा केवळ ३ लाख ६१ हजार ८२५ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.