मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील महापालिका क्रीडा भवन जिमखान्याच्या जागेवर काचेचा घुमट असलेला टाऊन हॉल, व्ह्युइंग गॅलरी, कॅफेटेरिया आदी उभारण्यास विविध स्तरातून विरोध होऊ लागला असून आता जनता दल (से) मुंबई पक्ष व मूलभूत अधिकार संघर्ष समितीही (मास) आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थिती क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल उभारू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका क्रीडा भवन हा महापालिकेचा एक स्वतंत्र उपक्रम असून त्याची स्वतंत्र घटना व नियमावली आहे. महापालिका आयुक्त हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असून, दोन उपाध्यक्ष तसेच कामगार अधिकारी, लेखापाल, विधी अधिकारी हे सदस्य आहेत. याशिवाय कर्मचारी प्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश आहे. क्रीडा भवनाचे १० हजाराहून अधिक सभासद, अडीच हजार आजीव सभासद असून दर दोन वर्षांनी समितीची निवडणूक होते. मुंबई महापालिका क्रीडा भवन जिमखान्यासाठी १९२६ साली तत्कालीन महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडून जागा मिळवून ती क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून दिली होती. पुढील वर्षी याला शंभर वर्षे होत असतानाच क्रीडा भवन जिमखाना गुंडाळण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत आहे. क्रीडा भवनाचा अर्थसंकल्प कोट्यावधी रुपयांचा असून लाखो रुपयांच्या ठेवी आहेत. या क्रीडा भवनातर्फे महापालिका मुख्यालयासमोरीलच नव्हे तर शिवाजी पार्क तसेच विविध विभाग कार्यालये, यानगृहे, रुग्णालये, मुद्रणालय आदी मिळून ३१ ठिकाणी क्रीडा केंद्र चालविण्यात येतात.

आर्थिक गैरव्यवहारामुळे कार्यकारिणी बरखास्त

आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे २०१० च्या सुमारास कार्यकारिणी बरखास्त करून त्याची जबाबदारी ए विभाग व जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे सोपविण्यात आली होती. दुसरीकडे तपास करून दोषींवर कारवाईही करण्यात आली. त्यानंतर निवडणूक घेऊन कारभार पुन्हा कार्यकारणीकडे सोपविणे आवश्यक होते. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी निवडणुका घेऊन कारभार कार्यकारिणीकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही निवडणूक घेण्यात आली नाही. आता मात्र क्रीडा भवन कार्यकारणी अस्तित्वात नसताना परस्पर निर्णय घेऊन या जागेचा पुनर्विकास करण्याचा घाट मुंबई महानगरपालिका घालत असल्याचा आरोप मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी यांनी केला आहे.

जिमखानाच उभारावा

कबड्डी, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळांच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. संबंधित खेळाडूंनी अखिल भारतीय महापालिका स्पर्धांमध्ये तसेच, टाइम्स शिल्ड क्रिकेटसारख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. क्रीडा भवन मुंबई क्रिकेट असोसिएशनशीही संलग्न आहे. त्यामुळे क्रीडा भवनाच्या जागेवर जिमखान्याचीच वास्तू उभारायला हवी, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्ष व मूलभूत अधिकार संघर्ष समितीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. तसेच तातडीने निवडणुका घेऊन क्रीडा भवनाची कार्यकारणी अस्तित्वात आणावी व त्यानंतरच या वास्तूच्या पुनर्विकासाचा विचार करावा, असेही महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.