तप्त हवेच्या झळांनी रात्रीही काहिली
प्रखर झळांनी दिवसभर घाम फोडणाऱ्या उकाडय़ाने आता मुंबईकरांच्या रात्रीचाही ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर भारतातील उष्णतेची लाट महाराष्ट्राकडे सरकू लागल्याने किमान तापमानात सुमारे तीन अंशाची वाढ झाली असून रात्रीही वाहणाऱ्या गरम वाऱ्याने मुंबईकरांच्या घरांची ‘भट्टी’ केली आहे. सापेक्ष आद्र्रतेतही लक्षणीय वाढ झाली आहे.
निम्मा एप्रिल संपल्यानंतरही यंदा उन्हाच्या झळा तीव्र झाल्या नव्हत्या. गेले आठवडाभर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत पारा चढला असून उन्हाच्या तीव्र झळा बोचू लागल्या आहेत. सध्या किमान तापमान तीन अंशांनी वाढून २४ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी किमान तापमान २६.३ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. उत्तर भारतातील उष्णतेची लाट महाराष्ट्राकडे सरकत आहे, अशी माहिती वेधशाळेतून देण्यात आली. त्यामुळे उकाडा व उष्णता वाढल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मध्य प्रदेश ते नैऋत्येकडील लक्षद्वीप बेटांपर्यंतच्या टापूत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून परिणामी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून या टापूकडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक भागात पावसाची शक्यता आहे.
डोंबिवलीत आज वीज नाही
महावितरण कंपनी दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने आज, शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत डोंबिवली ते बदलापूर पट्टय़ातील वीजपुरवठा बंद राहील.
डोंबिवली ते बदलापूर या पट्टय़ात महावितरणतर्फे अनेक ठिकाणी देखभालीचे काम केले जाणार आहे. त्यासाठीच कल्याण-डोंबिवली तसेच बदलापूरच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद असेल.