मुंबई : काही दिवसांपासून सातत्याने मुंबईमधील वातावरण बदलत आहे. तापमानात होणाऱ्या चढ – उतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा, मध्येच वाढलेला उकाडा असे वातावरण सध्या शहरात आहे. याबरोबरच, ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागला. दरम्यान, पुढील एक, दोन दिवस वातावरणातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवस मुंबईतील तापमानात घट झाली होती. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. अशातच मुंबईच्या तापमानात अचानक वाढ झाली. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वमानानुसार, मुंबईतील ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून असह्य उकाडा सहन करावा लागला. उन्हाचा तडाखा नसला तरी, उकाड्यामुळे मात्र मुंबईकर हैराण झाले. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३२.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले असले तरी, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे मात्र उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
मुंबईत पूर्व मोसमी पावसाचा अंदाज
मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात बुधवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यताही आहे.
काही भागात गरपीटीचा अंदाज
जळगाव, नाशिक, अहिल्या नगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, आणि जालना जिल्ह्यात मंगळवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर बुधवारी पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना या भागात गारपीटीचा अंदाज आहे. याचबरोबर मराठवाड्यात पुढील पाच दिवसांसाठी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात गडगडाटासह पावसाचा अंदाज
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी प्रतितास ३०, ४० किमी वेगाने वारे वाहतील.
पूर्व मोसमी आणि मोसमी पाऊस यांत फरक काय ?
- पूर्व मोसमी पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसात ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू होतो, काही वेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
- पूर्व मोसमी पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो.मोसमी पावसात ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
- पूर्व मोसमी पाऊस गडगडाटी, आणि रौद्र स्वरुपाचा असतो. मोसमी पाऊस संततधार, संथ असतो.