राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घटले असून पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात १० ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचे तापमान काल(शुक्रवार) २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तथापि, पुढील दोन दिवस सरासरी किमान तापमान हे १६-१७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा भारतीय हवामान विभागाने(IMD) अंदाजव वर्तवला आहे. तर सोमवारी तापमान १४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या हिवाळ्यातील शहरातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान हे १५ अंश सेल्सिअस होते, ज्याची २५ डिसेंबर रोजी नोंद झाली होती. मुंबईकरांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडगार वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता सांताक्रूझ येथील किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस, कुलाबा येथील १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाने केली.
आयएमडीनुसार शुक्रवारी सांताक्रूझमध्ये ६० टक्के सापेक्ष आर्द्रतेसह किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस आणि कमाल ३३.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कुलाबा येथे ७५ टक्के सापेक्ष आर्द्रतेसह किमान तपामान २२.२ अंश सेल्सिअस आणि कमाल ३१ अंश सेल्सिअस होते.
मुंबई आणि पुण्याची हवा बिघडली –
गेल्या काही दिवसांत थंडीने जोर धरत असल्यामुळे मुंबई आणि पुण्याची हवा बिघडली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने पुढील दोन दिवसांत मुंबईतील हवा अतिधोकादायक, तर पुण्याची हवा धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेअंतर्गत असलेल्या ‘सफर’ प्रणालीकडून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि हवेच्या गुणवत्तेचा अंदाज दिला जातो. त्यानुसार हवेच्या गुणवत्तेचे चांगली, समाधानकारक, सामान्य, धोकादायक, अतिधोकायदायक असे निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांनुसार मुंबई आणि पुण्याची हवा बिघडल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्यामुळे या दोन्ही शहरातील प्रदूषणातही वाढ झाली आहे. प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुण्याची हवा धोकादायक आणि मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर राहण्याचा अंदाज आहे.