मुंबई : कडाक्याच्या उन्हाळ्यास सुरुवात झाली असून तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मागील काही दिवस तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून मुंबईकरांची सुटका झाली होती. दरम्यान, मुंबईत मंगळवारी उष्ण वातावरण, तसेच उन्हाचा ताप सहन करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मंगळवारी दिवसभर उकाडा तसेच उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
मार्च महिना सुरू होताच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे तापमानात चढ – उतार होत असल्याचेही दिसून आले. मागील काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागणार आहे. समुद्रातून उशिरा येत असलेल्या वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. बुधवारपर्यंत उष्ण वातावरण राहील त्यानंतर मात्र तापमानात काहीशी घट होईल. या कालावधीत तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. तसेच उष्णतेत वाढ होणार आहे. मात्र असे असले तरी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्याइतपत ते प्रखर नसेल. त्यामुळे या काही दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले.
उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण करणारा एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हामुळे मुंबईकरांना चटक्यांची जाणीव करून दिली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात घट झाल्यामुळे उन्हाचे चटके कमी जाणवत आहेत. याचबरोबर सायंकाळनंतर हवेत गारवाही जाणवत आहे.
राज्यात उन्हाचा ताप वाढला
राज्यात कमाल तापमान पुन्हा चाळीशीपार गेले असून उन्हाचा ताप वाढू लागला आहे. अकोला आणि सोलापूरमध्ये सोमवारी ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. मंगळवारपासून कमाल तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांत वातावरण ढगाळ राहील, यामुळे उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.
तापमान सरासरी इतकेच
सध्या दिवसाचे कमाल तापमान कोकणात ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर राज्याच्या उर्वरित भागात ३६ अंशादरम्यान आणि किमान तापामान १८ ते २० अंशादरम्यान आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरी इतक्याच श्रेणीत आहेत.
अवकाळीचे वातावरण निवळणार
राज्यातील अवकाळी पावसाचे वातावरण सोमवारपासून निवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा धोका टळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मागील आठवड्यात ३-४ दिवस तापमानवाढीमुळे राज्याच्या काही भागात उष्णता अधिक जाणवली. पण त्यानंतर लगेचच कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे काहीसा दिलासा मिळाला.