मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने २७ नोव्हेंबरपासून १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.
हेही वाचा : नातेसंबंधांत दुरावा आल्यानेच बलात्काराची तक्रार, वकिलाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे जादा लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करून नुकतीच एक १२ डब्यांची वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. आता काही सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. १३ वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी ६ अप आणि ७ डाऊन दिशेने धावतील. यामध्ये १० जलद आणि ३ धीम्या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेटदरम्यान दोन लोकल फेऱ्या, विरार-वांद्रे, भाईंदर-अंधेरीदरम्यान प्रत्येकी एक फेरी, चर्चगेट-विरार दरम्यान दोन लोकल फेऱ्या, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक लोकल फेरी धावेल. पश्चिम रेल्वेवर आता १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतील. तर, शनिवार-रविवारी ५२ ऐवजी ६५ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.