Mumbai Western Railway Jumbo Block : मुंबईकरांसाठी रविवार म्हणजे सुट्टीचा नव्हे तर रेल्वे मेगाब्लॉकचा दिवस अशी ओळख बनली आहे. रविवारी मुंबईतील लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणं नित्याचंच झालं आहे. परंतु, या आठवड्यात फक्त रविवारच नव्हे तर तीन दिवस ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर हा जम्बो ब्लॉक असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुरती वाट लागली आहे. पश्चिम रेल्वेने २४, २५ व २६ जानेवारी रोजी जम्बो मेगा ब्लॉक घेतला असून या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
सकाळी सात वाजेपर्यंत लोकल सेवा पूर्ववत होईल असं रेल्वेने अधिकृतपणे सांगितलं होतं. त्यामुळे साडेसहा वाजल्यापासून प्रवासी स्थानकांवर जमण्यास सुरुवात झाली होती. परंतु, साडेसात वाजल्यानंतरही रेल्वे सेवा पूर्ववत झाली नाही. त्यामुळे अंधेरी, बोरीवली या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण सहा स्थानकांवर उभ्या असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्रीपासूनच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र सकाळी साडेसातनंतरही वाहतूक व्यवस्था पूर्ववत न झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला आहे. या रात्रकालीन ब्लॉकमुळे सकाळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
३३० हून अधिक गाड्या रद्द
पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ‘जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर तीन दिवस ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास ३३० हून अधिक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबद्दलची माहिती रेल्वे विभागाने आधीच दिली होती, तसेच रेल्वे फलाटांवरही तशा सूचना गेल्या दोन तीन दिवसांपासून दिल्या जात होत्या. तरी काही प्रवाशांनी तक्रार केली आहे की आम्हाला अशी माहिती मिळालीच नाही. शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे १२७ उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, २४ जानेवारी रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत माहीम व वांद्रे स्थानकादरम्यान जलद गाड्या धिम्या गतीच्या मार्गावरून चालवल्या जात आहेत. अजून दोन दिवस हा जम्बो ब्लॉक चालणार आहे. त्यामुळे उद्या व परवा देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो.