गेल्या महिन्याभरात मुंबईत दिवसा तापमानाचा पारा सामान्य तापमानाच्या वरच राहिल्यानंतर आता शहरात काहीसा गारवा जाणवू लागला आहे. बुधवारी मुंबईत किमान तापमान सामान्य तापमानाच्याही खाली म्हणजे १६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. त्याचबरोबर दिवसा मुंबईतील सामान्य तापमान बुधवारी ३१.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं. गेल्या दोन दिवसांत तापमानात झालेली जवळपास ३ अंशांची घट वातावरणातील गारठ्याच्या स्वरूपात मुंबईकरांना जाणवू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी हवामान विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सांताक्रूझमध्ये ३१.८ अंश सेल्सिअस तर कुलाब्यात २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सामान्य तापमानापेक्षा हे प्रमाण जवळपास १.२ अंश सेल्सिअसने कमी आहे. विशेष म्हणजे बुधवारची सकाळ मुंबईकरांसाठी गारठ्याची ठरली. बुधवारी सकाळी मुंबईत १६.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.

तापमानात अचानक घट का?

गेल्या महिन्याभरापासून तापमान सामान्य स्तरापेक्षा जास्त दिसून आल्यानंतर अचानक तापमानात घट का आली? यासंदर्भात तज्ज्ञांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली. स्कायमेट व्हेदर सर्व्हिसेसचे महेश पलवंत यांनी यासाठी उत्तरेकडील थंड हवामान कारणीभूत ठरल्याचं नमूद केलं आहे. “दिल्ली एनसीआर, राजस्थान आणि उत्तरेकडील इतर भागांत तापमानात मोठी घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून इथल्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे”, असं ते म्हणाले.

मुंबईकरांसाठी ही थंडी अल्पकालीन!

दरम्यान, हा गारव्याचा अनुभव मुंबईकरांसाठी अल्पकालीन ठरण्याची शक्यता आहे. कारण आठवड्याच्या शेवटापर्यंत म्हणजेच शनिवार-रविवार येईपर्यंत तापमान पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दोन दिवसांनंतर पश्चिमेकडून अरबी समुद्रावरून उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतलं वातावरण या दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय, १ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतलं वातावरण साधारण ३१ अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि त्यानंतर २ फेब्रुवारीपासून त्यात वाढ व्हायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ही वाढ ३३ अंश सेल्सिअसपर्यंत असू शकते, असंही सांगण्यात आलं आहे. २ आणि ३ फेब्रुवारी रोजी हवामान ढगाळ राहण्याचाही अंदाज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai whether update imd predicts dip in temperature pmw