दक्षिण मुंबईतील इमामवाडा परिसरात ३३ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रथम अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली होती. तपासाअंती पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मंजिला बीबी सुखचंद शेख असे मृत महिलेचे नाव आहे. त्या इमामवाडा येथील मैदानाजवळील पत्र्याच्या चाळीतील घरात पती सोबत रहात होत्या. मंजिला यांचा पती सुखचंद शेख उर्फ मुक्तार हा बांधकाम स्थळी मजुर म्हणून काम करीत होतो. सुखचंद आणि मंजिला बीबीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मंजिला बीबी रविवारी घरात मृतावस्थेत आढळल्या. घराचा दरवाजा उघडा होता. तसेच मुक्तार गायब असल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ जे. जे. मार्ग पोलिसांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. मंजिला बीबी यांना जे. जे. रुग्णालयात नेले असता त्यांच्या गळ्यावर व्रण आढळले. गळा आवळून त्यांना मारल्याचा संशय होता. मंजिला बीबी यांची चुलत बहीण सलीना शेख यांच्या तक्रारीवरून जे. जे. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.

आरोपीने १३ ऑगस्ट रोजी रात्री दोरीने अथवा इतर वस्तूच्या मदतीने गळा आवळून मंजिला बीबीची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी एक पथक आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader