मुंबई : राज्यात थंडी पडली असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद १० अंशाखाली झाली आहे. तसेच मुंबई उपनगरांतही किमान तापमान २० अंशाच्या खाली नोंदले गेले आहे. मुंबईकर गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा अनुभव घेत आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मंगळवार आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास गारठा वाढलेला जाणवला. त्यानंतर गुरुवारी सकाळी किमान तापमान १८.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर कुलाबा येथे गुरुवारी २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उपनगरांत तापमानाचा पारा घसरला असून सकाळी मैदानात खेळायला, व्यायाम करायला जाणाऱ्या उपनगरवासीयांना धुक्याचा अनुभव घेत आहेत. वातावरणात गारठा वाढल्याने थंडीपासून रक्षणासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.

हेही वाचा : मुंबई: गोवंडीत बनावट नोटांसह एकाला अटक

नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सांताक्रूझ येथे किमान तापमान २० अंशाखाली नोंदले जात आहे. मुंबई शहरामध्ये गारठ्याची जाणीव फारशी झालेली नाही. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा कायम आहे. ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत

काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. अनेक भागात ‘वाईट’ हवेची नोंद होत आहे. गुरुवारी मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. मुंबईचा हवा निर्देशांक १३३ इतका होता. अनेक भागात हवा निर्देशांक १००च्या वर होता. कुलाबा येथे गुरुवारी समाधानकारक हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक ९७ इतका होता.

हेही वाचा : शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सहा वर्षे अडगळीत, रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे अनावरणात अडसर

समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी सायंकाळचा हवेचा निर्देशांक

वांद्रे-कुर्ला संकुल- १५८

बोरिवली- १९३

माझगाव- १३८

शिवाजीनगर- १९९

शिवडी- १५१

मालाड- १५२