मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृती सुरु होऊन दोन दिवस होत नाहीत तोच म्हाडाच्या सोडतीचे अ‍ॅप मंदावले आहे. नोंदणी करताना, ऑनलाईन कागदपत्रे जमा करताना आणि कागदपत्रांच्या पडताळणीत अडथळे येत असून त्यासाठी बराच मोठा कालावधी लागत आहे. त्यामुळे इच्छुक अर्जदार संतप्त झाले आहेत. मुळात अर्ज भरण्यासाठी यंदा केवळ २६ दिवसांचाच कालावधी असून अ‍ॅपबाबत अनेक तक्रारी म्हाडा प्राधिकरणासह मुंबई मंडळाकडे येत आहेत.

ताडदेव, वरळी, वडाळा, दादर, पवई, विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली आदी ठिकाणच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी शुक्रवारपासून अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ९ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरु झाली असून तीन दिवसात अनामत रक्कमेसह १००० अर्ज सादर झाले आहेत. ही संख्या कमी मानली जात आहे. मुळात यंदा अत्यल्प आणि अल्प गटातील घरे प्रचंड महाग असल्याने इच्छुकांकडून सोडतीकडे पाठ फिरवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात आत जे इच्छुक अर्ज भरण्यासाठी पुढे येत आहेत त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोडतीचे अ‍ॅप अत्यंत संथगतीने सुरु असल्याने नोंदणी आणि अर्ज भरुन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

हेही वाचा – वडपे ते ठाणे जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास मे २०२५ पासून

अर्जविक्री-स्वीकृतीसाठी प्रत्येक मंडळाकडून किमान ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. असे असताना यावेळी मुंबई मंडळाने केवळ २६ दिवसांचाच कालावधी दिला आहे. इतक्या कमी कालावधीत कागदपत्रे कशी जमा करायची, अनामत रक्कम कशी जुळवायची असा प्रश्न अनेकांसमोर असताना त्यात आता अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींना इच्छुकांना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी अशाच राहिल्यास ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज कसा भरायचा असा प्रश्न इच्छुकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अन्यथा अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ द्यावी अशीही मागणी इच्छुकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – कृत्रिम प्रज्ञेद्वारे पाच महिन्यात १०१ शस्त्रक्रिया; केईएम रुग्णालयात उपक्रम

उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्डची पडताळणी विलंबाने होत असल्याने नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी वेळ लागत असल्याचे चित्र आहे. याविषयी मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अ‍ॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे मान्य केले आहे. मात्र कागदपत्रांची काटेकोर पडताळणी व्हावी यासाठी अ‍ॅपमध्ये काही बदल केले आहेत. त्यापूर्वी उत्पन्नाच्या माहितीसह इतर माहिती चुकीची देत म्हाडाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यासाठी आम्ही काही बदल केले असून या बदलानुसार कागदपत्र पडताळणी होत आहे. अशावेळी नावात किंवा इतर माहितीत काही तफावत असल्यास पडताळणीसाठी विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कागदपत्रांची पडताळणी वेगाने व्हावी यासाठी आवश्यक ते बदल अ‍ॅपमध्ये करुन घेण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तर अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देणार का यावर हा निर्णय म्हाडा उपाध्यक्षांचा असेल ते त्यांनी स्पष्ट केले.