Mumbai Crime : घरात पाळलेली मांजर लपवली म्हणून ३८ वर्षांच्या महिलेने पाच वर्षांच्या मुलीला जबरदस्त मारहाण करुन लोखंडी रॉडने चटके दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीने तिच्या घरी सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोवंडी या ठिकाणी गुरुवारी ही घटना घडली. मुंबईतल्या गोवंडीमध्ये असलेल्या शिवाजी नगर भागात राहणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
नेमकी काय घटना घडली?
पाच वर्षांच्या मुलीचे पालक मागच्या तीन महिन्यांपासून गोवंडी या ठिकाणी राहतात. त्यांच्या शेजारी ३८ वर्षांची एक महिला राहते. तिची मांजर लपवल्याने त्या महिलेने या पाच वर्षांच्या मुलीला मारहाण केली आणि तिला लोखंडी रॉडने चटके दिले. या महिलेचं नाव निशाद शेख असं आहे. तिची मांजर हरवल्याने ती अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने या कारणावरुन पाच वर्षांच्या मुलीला मारहाण केली आणि तिला चटकेही दिले अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे पण वाचा- मिरा रोड गोळीबार प्रकरण, पोलिसांची ७ पथके स्थापन
पोलिसांनी आणखी काय सांगितलं?
पाळलेली मांजर मिळत नसल्याने निशाद शेख नावाची महिला अस्वस्थ झाली होती. तिने पाच वर्षांच्या मुलीला माझी मांजर कुठे आहे असं विचारलं. त्यावेळी या मुलीने काहीही सांगण्यास नकार दिला. ज्यानंतर या महिलेने तिला मारहाण केली असा आरोप आहे. तसंच तिच्या उजव्या पायाला चटका दिला. या घटनेनंतर पाच वर्षांच्या मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती आता ठिक असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाळीव प्राणी कुणालाही प्रिय असतो, यात शंकाच नाही. मात्र या वरुन एका ३८ वर्षीय महिलेने पाच वर्षांच्या मुलीला केलेली मारहाण आणि चटके देण्याची कृती करणं निषेधार्ह आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान आजच एका शिक्षकला विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
मुंबईत शुक्रवारी पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे. धावण्याचा सराव करणाऱ्या मुलीवर या शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करुन अश्लील चाळे केले असा आरोप आहे. १२ वर्षांची पीडित मुलगी २७ डिसेंबरला शाळेच्या मैदानावर धावण्याचा सराव करत होती. त्यावेळी शारिरीक शिक्षण हा विषय शिकवणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षकाने या मुलीला वर्गात नेलं, दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी अश्ली चाळे केले असा आरोप आहे. या प्रकरणी शुक्रवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सदर शिक्षकाला अटक करण्यात आली.