Tinder या डेटिंग अॅपवर मुंबईतल्या एका महिलेची लाखोंची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे आधीच ३.३७ लाख रुपये गमावलेल्या या महिलेची आणखी पाच लाखांना फसवणूक होणार होती. पण फक्त एका बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे सदर महिलेचं मोठं नुकसान टळलं. पण, आधी गमावलेले ३.३७ लाख मात्र या महिलेला परत मिळणं दुरापास्त झालं असून पोलिसांत दाखल तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं महिलेच्या बाबतीत?

पीडित महिलेची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीशी टिंडर या डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. पीडित महिला ४३ वर्षीय आर्किटेक्ट असून मुंबईत वास्तव्यास असते. आरोपीनं त्याचं नाव ‘अद्वैत’ असं सांगून महिलेला फसवलं. टिंडरवर त्यानं आपली ओळख सांगताना आपण विदेशात असून १६ सप्टेंबर रोजी भारतात येणार असल्याचं त्यानं महिलेला सांगितलं.

एक फोन कॉल आला आणि ३.३७ लाखांचा फटका बसला!

दरम्यान, आरोपी भारतात यायच्या दिवशी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी महिलेला एक फोन कॉल आला. आपण दिल्ली कस्टम अधिकारी बोलत असून अद्वैतला मोठ्या प्रमाणावर युरोंसह ताब्यात घेण्यात आलं आहे, असं समोरील व्यक्तीनं फोन कॉलवर सांगितलं. महिला घाबरल्याचं लक्षात येताच समोरील व्यक्तीनं अद्वैतच्या सुटकेसाठी ३ लाख ३७ हजार रुपये तात्काळ यूपीआय ट्रान्सफर करण्यास सांगितलं. त्यानुसार, महिलेनं तेवढी रक्कम तात्काळ ट्रान्सफर केली.

पण एवढ्यानं आरोपीचं समाधान झालं नाही. अधिक रक्कम मिळण्याच्या शक्यतेमुळे आरोपीनं फोनवर महिलेकडे आणखी ४ लाख ९९ हजार रुपयांची मागणी केली. महिलेनं त्याचीही तयारी केली. पण जेव्हा ही रक्कम बँक अकाऊंटवरून ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न सदर महिला करू लागली, तेव्हा एका सतर्क बँक अधिकाऱ्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यानं तातडीनं सदर महिलेला हा घोटाळा असू शकतो, असं सांगून सतर्क केलं. त्यामुळे महिलेनं लागलीच पोलिसांत धाव घेतली आणि हा सगळा प्रकार कथन केला.

Gujarat Crime: धक्कादायक! पहिलीच्या चिमुकलीवर शाळा मुख्याध्यापकाचा बलात्काराचा प्रयत्न; विरोध केला म्हणून गळा दाबून केली हत्या

पोलीस तक्रार, गुन्हा दाखल!

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वर्सोवा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याअनुषंगाने तपास करत आहेत. त्यामुळे एका बँक कर्मचाऱ्याच्या मध्यस्थीमुळे पीडित महिलेचं आणखी नुकसान होणं टळलं.

अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी मालाडमधील एका ३३ वर्षीय महिलेला २.४५ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. तेव्हाही आरोपीनं आपण एक डॉक्टर असून ब्रिटनमध्ये राहातो व भारतात परत येत असताना कस्टमच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला पकडल्याचा बनाव केला होता.