मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवेवरही झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक उशिराने होत आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, दादर या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली आहे. अशीच परिस्थिती नवी मुंबईतल्या स्थानकांवरही आहे. याच पावसात एक घटना घडली आहे लोकल पकडत असताना एक महिला रुळावरुन खाली पडली आणि तिच्या अंगावरुन ट्रेन गेली. या घटनेत तिचा जीव वाचला आहे पण तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्रभर मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी

रात्रभर मुंबईसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. कुर्ला, चुनाभट्टी, सायन परिसरात पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवरही साचलं होतं. हार्बर मार्गावरच्या रेल्वेही उशिराने धावत आहेत. तर काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरु असतानाच त्यांना प्रचंड गर्दीचाही सामना करावा लागतो आहे. बेलापूरला ठाण्याला जाणारी लोकल आल्याने प्रवाशांची गर्दी झाली होती. या गर्दीतच महिलेचा पाय घसरला आणि तिच्या अंगावरुन रेल्वेचा पहिला डबा गेला. ज्यात या महिलेला तिचे पाय गमवावे लागले आहेत. सातत्याने जो पाऊस पडतो आहे त्याचा परिणाम विमान सेवेवरही झाला आहे. मुंबई विमानतळावरील विमानांची ये-जाही उशिराने सुरु आहे.

हे पण वाचा- Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा आमदार अन् मंत्र्यांना फटका; रेल्वे ट्रॅकवरुन करावा लागला पायी प्रवास

नेमकी काय घटना घडली?

पनवेलहून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी ९.३० च्या सुमारास सीबीडी बेलापूर या स्थानकात येत होती. त्यावेळी एक महिला पाय घसरुन रुळावर पडली. तिच्या अंगावरुन रेल्वेचा पहिला डबा गेला. या घटनेमुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांची तारांबळ झाली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने काही वेळातच ट्रेन मागे घेतली आणि या महिलेचा जीव वाचवला. मात्र या घटनेत महिलेला तिचे पाय गमवावे लागले आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी तातडीने ट्रॅकवरुन वर आणलं

महिला लोकल ट्रेनखाली आल्याने अचानक लोकांनी तिथे गर्दी केली. मात्र पोलिसांनी वेळीच त्या ठिकाणी येत गर्दीवर नियंत्रण आणलं. या महिलेला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा तिचे पाय रक्काळलेले होते. दोन पोलिसांनी तातडीने उडी मारुन तिला ट्रॅकच्या मधून बाहेर काढलं. लोक या घटनेचा व्हिडीओ काढत होते. या महिलेचा जीव वाचला असला तरीही तिचे पाय तिला गमवावे लागले आहेत. त्यामुळे लोकांनीही हळहळ व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय आवाहन केलं?

मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतुकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai woman survives after local train runs over her loses legs scj
Show comments