Accident News Mumbai: श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविका महिलेवर काळाने घाला घातला आहे. वसईतील तुंगारेश्वर मंदिरात पतीबरोबर दर्शनासाठी गेलेल्या महिलेने परतीच्या प्रवासात एका क्षुल्लक चुकीमुळे आपला जीव गमावला आहे. अनेक महिलांना बाईक, स्कुटीवरून प्रवास करताना साडीचा पदर, ड्रेसची ओढणी गळ्यात घालण्याची सवय असते. पण हीच चुक या महिलेच्या जीवावर बेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गळय़ातील ओढणी दुचाकीत अडकून झालेल्या अपघातात २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पुलावर रविवारी संध्याकाळी हा अपघात घडला. प्रतिभा यादव असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
कांदिवलीच्या इराणीवाडी येथील मनीष यादव (३३) व प्रतिभा यादव (२७) हे दाम्पत्य रविवारी वसईच्या तुंगारेश्वर देवस्थानाला दर्शनासाठी जाण्याचे ठरवले होते. रविवारी पहाटे महादेवाचे दर्शन घेऊन पती-पत्नी बुलेटवरुन कांदिवली येथे घरी परतत होते. सदर बुलेट सुद्धा प्रतिभा यांच्या एका परिचिताची होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत महिलेच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्यानंतर चाकात गुंडाळत गेली. यामुळे प्रतिमा हिच्या गळ्याला फास बसून ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, अपघातानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. प्रतिभाच्या गळय़ात दुपट्टा होता. तो दुचाकीत अडकून ती खाली पडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतून धडा घेत महिलांनी अशाप्रकारे गळ्यात ओढणी घेणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी सुद्धा केले आहे.
हे ही वाचा<< रस्त्याच्या कडेला चुकूनही गाडी थांबवू नका, स्कुटी तर नाहीच! ‘हा’ क्षण पाहून अंगावर येईल काटा
आपणही अशी चूक करत असाल तर आजच सावध व्हा. बाईकवरून प्रवास करताना ओढणीची टोकं फार खाली नसतील असे पाहा. शक्य झाल्यास ओढणी बॅगेतच ठेवत जा व धूळ- माती उडू नये म्हणून लहान आकाराचा स्कार्फ चेहऱ्याला गुंडाळा.