मुंबई : वरळीतील महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीवासियांनी सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी रविवारी आंदोलन केले. विशेष म्हणजे ही झोपडपट्टी सागरी किनारा मार्गाला लागूनच आहे. एकाबाजूला महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सागरी किनारा बांधला, तर दुसरीकडे वर्षभरापासून झोपडपट्टीवासियांसाठी शौचालय बांधण्याचे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे हा विरोधाभास रविवारी या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट दिसून आला.
वरळी येथील महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीत सुमारे बाराशे कुटुंबे राहतात. या परिसरातील शौचालयाचे बांधकाम मुंबई महापालिकेने वर्षभरापूर्वी बंद केले. येथील रहिवाशांसाठी मुंबई महापालिकेने एक तात्पुरते फिरते शौचालय दिले आहे. मात्र या शौचालयाची स्वच्छता केली जात नाही, या शौचालयात पाण्याची सुविधा नाही, तसेच शौचालयाचा परिसरही अस्वच्छ आहे. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीला कंटाळून येथील रहिवाशांनी रविवारी या परिसरात मोर्चाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे रहिवाशांनी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या शौचालयाचे काम तीन दिवसांत सुरू करावे आणि एक महिन्याच्या आत शौचालयाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी या परिसरातील महिलांनी केली आहे.
हेही वाचा – दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
मुंबईतील ६० टक्के जनता झोपडपट्टीत राहते. येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालयांशिवाय (कम्युनिटी टॉयलेट) पर्याय नसतो. मात्र बहुतांशी ठिकाणच्या शौचालयांची दूरवस्था झाली आहे. काही ठिकाणी शौचालये मोडकळीस आली आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याचीही शक्यता असते. शौचकूपांची संख्या कमी असल्यामुळे एकेका शौचकूपाचा वापर मोठ्या संख्येने होतो. यावर उपाय म्हणून पालिकेने वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत वस्त्यांमधील शौचालयांची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. गेल्यावर्षी पालिकेने लॉट ११ या उपक्रमांतर्गत २२ हजार शौचकूप बांधण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत.
हेही वाचा – मुंबई : शस्त्रांचा धाक दाखवून १० लाख रुपये लूटले
यावर्षी लॉट १२ अंतर्गत आणखी शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हाडाचीही शौचालये ताब्यात घेण्यात येणार असून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. एकमजली शौचालयांची पुनर्बांधणीही करून त्याजागी दुमजली शौचालये बांधण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी नव्याने शौचालय बांधले जाणार आहे. त्याकरीता लॉट १२ अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५५९ शौचालये बांधण्यात येणार असून त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकूण १४,१६६ नवीन शौचकूपांचे बांधकाम केले जाणार आहे. मात्र काही ठिकाणी कंत्राटदार शौचालय बांधणीसाठी उशीर करतात व त्यामुळे रहिवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.