Mumbai Women Sells Off 100 Crores Property: मुंबईतील एका ५८ वर्षीय महिलेने भावांच्या साथीने आपल्या चुलत भावंडांची फसवणूक करून मुंबईतील तब्बल १०० कोटींची प्रॉपर्टी एका विकासकाला विकली आहे. या प्रकरणात महिलेच्या चुलत भावंडांनी तक्रार केल्यानंतर आता महिलेला मुंबई पोलिसांनी म्हैसूर हॉटेल येथून अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, लोअर परळमधील डिलाईल रोड येथे असणारी ही २ एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली मालमत्ता या महिलेने विकली आहे. यामध्ये तीन भाड्याने दिलेल्या इमारतींचा सुद्धा समावेश आहे. EOW च्या कक्षाने कर्नाटकातील म्हैसूर येथून आरोपी महिला अबिदा जाफर इस्माईलला अटक केली होती. मागील आठवड्यात ४७ व्या महानगर न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील तक्रारदार हा आबिदाचा चुलत भाऊ अयाज कपाडिया आहे. अयाज कपाडिया यांचे दिवंगत वडील जाफर कपाडिया आणि त्यांचा भाऊ लतीफ कपाडिया यांच्या नावावर मालमत्तेतील मोठा भाग आहे. भाड्याने दिलेल्या जागा (झिया मासूम चाळ, भैया चपरा चाळ आणि इराणी चाळ) अनेक भाडेकरू आहेत जे नियमितपणे लतीफच्या कुटुंबाला मासिक भाडे देत आहेत आणि लतीफचा मोठा मुलगा अझीझ या मालमत्तेची देखभाल करत होता. “लतीफला अजिज, रहीम, अमिना, आबिदा आणि मलिक असे तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दुसरीकडे, जाफरच्या पश्चात फरजाना, रुक्शाना, रेहाना, अमीन, अन्वर, मेहजबीन आणि अयाज असं मोठं कुटुंब आहे. “
यापैकी लतीफ आणि त्याच्या कुटुंबाने बिग ट्री डेव्हलपर्सला सदर जागा विकताना आपल्याकडे शंभर टक्के मालकी असल्याचे खोटे सांगितले होते व त्यानुसारच चुकीचा करार करण्यात आला होता. यामध्ये लतीफने तक्रारदारांसह डेव्हलपर्सची सुद्धा फसवणूक केली आहे, असा आरोप अयाजने केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अमिना, ज्यांच्याकडे तिच्या भावांची पॉवर ऑफ अॅटर्नी आहे आणि तिने कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. या व्यवहारात तिला ३. ५ कोटी रुपये व नवीन इमारतींमध्ये दोन फ्लॅटचे आश्वासन देण्यात आले होते. कराराची रक्कम काय होती हे स्पष्ट झाले नाही, परंतु पोलिसांनी तीन मालमत्तांची अंदाजे किंमत ५० कोटी रुपये मोजली आहे.
हे ही वाचा<< २७ ऑक्टोबरपासून मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास वाढणार! अकरा दिवस २५०० हुन अधिक ट्रेनच्या फेऱ्या रद्द
प्राथमिक तपासात असे समजले की, अमिना आणि तिचे दोन भाऊ रहीम आणि मलिक यांना पैशांची गरज होती, त्यामुळे त्यांनी विकासकासह गुपचूप करार करण्याचा कट रचला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी यापूर्वी हीच मालमत्ता दुसर्या विकसकाला विकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु करार यशस्वी झाला नाही. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.