मुंबई : मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भांडूप (प.) येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नवीन शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपत आल्यामुळे पालिकेने हा साडेतीन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे.

शहरापासून दूर असलेल्या धरणांतील पाणी मुंबईकरांच्या घराघरात पोहोचण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची अशी त्रिस्तरीय यंत्रणा आहे. धरणातील पाणी २४०० मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांतून व ५५०० मि.मी. व्यासाच्या कॉंक्रिटच्या भूमीगत जलबोगद्याच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षणद्वारे पांजरापुर व भांडुप संकुल येथे आणले जाते. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुक केले जाते व तेथून एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी मुंबई शहरात ठिकठिकाणच्या २७ सेवा जलाशयापर्यंत पोहोचवले जाते. मात्र जलशुद्धीकरण करणारा हा प्रकल्प पालिकेने ४४ वर्षांपूर्वी उभारलेला असून त्याचे आयुर्मान आता संपत चालले आहे. हा प्रकल्प संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला असून त्याचे वापरण्यायोग्य आयुर्मानही संपुष्टात येत आहे. त्यामुळे पालिकेने भांडूप संकुल परिसरात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी चालू अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपयांची तरतुदही करण्यात आली होती.

हेही वाचा – मुंबई : आचारसंहिता लागू होताच राजकीय फलक उतरवण्यास सुरुवात, ४८ तासांत ७ हजार ३८९ बॅनर्स, फलक हटवले

या प्रकल्पाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधून पूर्ण होईपर्यंत जुना प्रकल्प सुरू ठेवण्यात येणार आहे. नवीन प्रकल्प बांधून झाल्यानंतर त्याला सर्व यंत्रणा जोडण्यात येणार आहेत. या संकुलात ९०० दशलक्ष लीटर क्षमतेचा आणखी एक जलशुद्धीकरण प्रकल्प असून या संकुलाची एकूण जलशुद्धीकरणाची क्षमता २,८१० दशलक्ष लीटर इतकी आहे.

हेही वाचा – मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रातून केला जातो. सध्या या ठिकाणी १९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प असून नवीन प्रकल्पात याची क्षमता २००० दशलक्ष लीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.