मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या आणि पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आला आहे. या पुलाच्या दुसऱ्या तुळईची जोडणी पूर्ण झाली असून हा पूल आता लवकरच रेल्वे रुळांवर स्थापित केला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मध्य रेल्वेकडे ब्लॉक घेण्याची विनंती केली आहे. पालिकेने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे.
दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत पुलाची एक तुळई बसवण्यात आली आहे. तर दुसरी तुळई बसवण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या तुळईची जोडणी पूर्ण झाली असून ५५० मेट्रिक टन वजनाची तुळई (गर्डर) महानगरपालिकेच्या हद्दीत ९.३० मीटरपर्यंत चाचणी स्वरूपात सरकविण्याची कार्यवाही मंगळवार, १४ जानेवारी रोजी यशस्वीपणे पार पडली. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यावेळी उपस्थित होते. मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ब्लॉक’ जाहीर केल्यानंतर पाच तासांत रेल्वे मार्गावर तुळई सरकवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मध्य रेल्वेला विनंती केली आहे.
हेही वाचा…एसटीच्या चालक, वाहकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास कारवाई, विशेष तपासणी मोहीम सुरू
जूनमध्ये पूल सुरू करण्याचे उद्दीष्ट्य
रेल्वे मार्गावर तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामचे वेळापत्रक पालिका प्रशासनाने तयार केले आहे. त्यानुसार कामे झाल्यास जून महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्चिम दिशेच्या पोहोचमार्गासाठी (ॲप्रोच रोड) खांब बांधणीचा (पाईल फौंडेशन) पहिला टप्पा १५ मार्च २०२५ पर्यंत, १७ एप्रिल २०२५ पर्यंत खांब उभारणी, ३ मे २०२५ पर्यंत पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि १ जून २०२५ रोजी भार चाचणी (लोड टेस्ट) करण्याचे नियोजन आहे. या वेळापत्रकानुसार अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्यासाठी जानेवारी महिन्यात मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ब्लॉक’ मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे.