मुंबई : सागरी किनारा रस्त्यावर भरधाव वेगात धावणाऱ्या हिरे व्यापाऱ्याच्या बीएमडब्ल्यू गाडीने दिलेल्या धडकेत कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हिरे व्यापारी राहिल हिंमाशु मेहता (४५) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

या अपघातात कामगार काश्मिर मिसा सिंहचा मृत्यू झाला आहे. सिंगचा सहकारी पिंटुकुमार जातन ठाकुर (३६) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ठाकूर याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून सागरी किनारा रस्ता प्रकल्पस्थळी वेल्डींगचे काम करण्यात येत आहे. सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे काम करणाऱ्या एचसीसी कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी जिजामाता नगर येथे निवासाची व्यवस्था केली आहे. त्यांच्यासोबतच वायरमन काश्मिर मिसा सिंगही राहात होता. नेहमीप्रमाणे १६ सप्टेंबर रोजी सगळे कामावर हजर झाले. १७ सप्टेंबर रोजी पूजा असल्याने सागरी किनारा रस्ता प्रवेशद्वार क्रमांक २ वरळी दूध डेरीसमोर मंडप बांधण्याचे काम सुरू होते. तेथे उभा असताना अचानक जोरात आवाज झाला. घटनास्थळी धाव घेतली असता सागरी किनारा रस्त्याच्या दक्षिण वाहिनीच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने सिंहला धडक दिल्याचे दृष्टीस पडले, असे पोलिसांना सांगितले.

हेही वाचा – मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ, विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत १० हजार १११ मतदान केंद्रे, प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात म्हाडाला मिळणार सुमारे १४०० घरे ?

अन्य कामगारांच्या मदतीने सिंहला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सिंगचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले. मेहता मलबार हिल परिसरात वास्तव्यास आहेत.