बस, रेल्वेतून प्रवास करताना किंवा गर्दीच्या ठिकाणी आपल्या खिसा पाकिटावर लक्ष ठेव, अशा सूचना मुंबईकरांना घरातून निघताना मिळत असतात.  मुंबईतील गर्दी दिवसेंदिवस वाढत असताना असुरक्षिततेची भावना तर आणखीनच वाढीस लागत आहे. परंतू या सगळ्यामध्ये एक आनंदाची बातमी मुंबईकरांसाठी येऊन धडकली आहे. मुंबई हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर असल्याचं एका सर्वेक्षणात सिध्द झालं आहे. ‘रिडर्स डायजेस्ट’ने केलेल्या सर्वेक्षणात यावर शिक्कामोर्तब झालंय.
या सर्वेक्षणाचा भाग म्हणून एक सोपा प्रयोग करण्यात आला. पैशांनी भरलेलं पाकिट गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि ते पाकिट किती जण परत करतात याची निरीक्षणं नोदंवण्यात आली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण रस्त्यावर ठेवलेल्या १२ पाकिटांपैकी ९ पाकिटं मुंबईकरांनी परत केली. विशेष म्हणजे या पाकिटात तीन हजार रुपये इतकी भरघोस रक्कम होती. पहिल्या क्रमांकावर फिनलॅंड येथील हेलसिन्की हे शहर असून, या शहरात बारा पैकी ११ पाकिटं परत करण्यात आली.
जगातील १६ शहरांमध्ये ‘रिडर्स डायजेस्ट’तर्फे विविध ठिकाणी १९२ पाकिटं ठेवण्यात आली. यामध्ये मोबाईल क्रमांक, कुटुंबाचा फोटो, कुपन्स आणि बिझनेस कार्ड, तसेच साधारण तीन हजार रूपये ठेवण्यात आले होते.
बुडापेस्ट आणि न्यूयॉर्क ही शहरे अनुक्रमे तिस-या स्थानावर असून, तेथील नागरिकांनी आठ पाकिटं परत केली. दरम्यान, रशियातील मॉस्को आणि नेदरलॅंडमधील अॅमस्टरडॅम शहरात एकूण सात पाकिटे परत करण्यात आली. सर्वेक्षणात पोर्तुगालमधील लिस्बन शहर सर्वात अप्रामाणिक शहर असल्याचं सिध्द झालं आहे. या शहरात फक्त एकच पाकिट परत मिळालं. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा