मुंबई : प्रसिद्ध धर्मा प्रोडक्शन कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून समाज माध्यमांवरून संपर्कात आलेल्या आरोपींनी मॉडलिंगमध्ये संधी देण्याचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरूणीकडून दागिने व रोख रक्कम स्वरूपात ४५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण वायरल करण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार तरूणी संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेत असून कुटुंबियांसोबत राहते. इन्स्टाग्रामवर मॉडलिंगमध्ये सुवर्णसंधी असल्याबाबतचा संदेश तिला आला होता. तिने शाहनिशा केली असता ‘हार्दिक’ नावाच्या या युजर आयडीने तो धर्मा प्रोडक्शनचा प्रतिनिधी असून त्याचे नेटफ्लिक्स व इतर ओटीटीमध्ये चांगले संबंध असल्याचे सांगितले. नवीन कलाकारांना त्यांनी संधी दिली असून आज त्या कोट्यावधी रुपये कमवत असल्याचेही सांगितले. तिने प्रक्रियेबाबत विचारले असता त्याने राहुल चव्हाण नावाच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दिला. तिने राहुलशी संपर्क साधला. २० हजार रुपये भरल्यानंतर सर्व योजनेबद्दल माहिती देण्यात येईल, असे त्याने सांगितले. त्यानंतर तिने वडिलांना सांगून २० हजार रुपये आरोपी राहुलला पाठवले. त्याने तिला वांद्रे येथील एका दुकानात भेटण्यासाठी बोलावले. तेथे पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी त्याने आणखी २० हजार रुपये तरूणीकडून घेतले.

हेही वाचा : मुंबई: ‘बेस्ट बचाव’साठी ३६ आमदारांनाही सहभागी केले जाणार

परदेशी कंपनीसाठी मॉडलिंगची संधी असून त्यातून १० लाख रुपये मिळतील, असे सांगितले. तरूणीने तिच्याकडे एवढी रक्कम नसून आई – वडीलही एवढी रक्कम देणार नसल्याचे सांगितले. त्यावर राहुलने तिला कुटुंबियांच्या नकळत घरातील दागिने घेऊन येण्यास सांगितले. तरूणीने त्याला घरातील दागिने दिले. पुढेही आरोपीने पैशांची मागणी केली. पण त्याला नकार दिल्यावर राहुलने मॉडलिंगचे काम देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे तरूणीने घरातील सर्व सोने आरोपीला दिले. आरोपीने पीडित मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला व त्याचे छायाचित्रण व चित्रीकरण केले. त्या छायाचित्रांच्या माध्यमातून हार्दिकनेही तिला धमकावून नग्न छायाचित्र पाठवण्यासाठी धमकावले. त्यानंतर राहुलला परिचित श्रेयसनेही तिला अश्लील संदेश पाठवण्यास सुरूवात केली. पीडित तरूणीची आरोपीने एकूण ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. छायाचित्र समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी राहुल देत होता. त्यामुळे पीडित मुलगीही घाबरली होती. अखेर तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर याप्रकरणी भांडूप पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी खंडणी, फसवणूक, धमकावणे, बदनामी करणे, बलात्कार यासह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राहुल चव्हाण, हार्दिक व श्रेयस पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai young girl cheated with the lure of modeling 45 lakh extortion case against three mumbai print news css