मुंबई : मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत वैयक्तिक कामासाठी आलेल्या तरुणाच्या बॅगेत चाकू आढळल्याने गुरुवारी खळबळ उडाली. याप्रकरणी संशयित तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सीआयपीसी कलम ४१ (अ)१ अंतर्गत नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्ञानेश्वर सुग्रीव सुर्यवंशी या २९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी नवीन प्रशासकीय इमारतीबाहेरून ताब्यात घेतले होते. मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत दुपारी एक तरुणाने प्रवेश केला. सामानाची तपासणी करत असताना त्याच्या बॅगेत चाकू आढळल्याने त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावर अडवले.
हेही वाचा : “मोदी सरकार विचलित झाल्याने एक देश, एक निवडणूक”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
त्याच्याकडे याबाबत चौकशी केली, मात्र चौकशीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित तरुण व्यवसायाने स्वयंपाकी असून मरीन ड्राईव्ह पोलीस त्याची याप्रकरणी चौकशी करत आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यवंशी हा लातूरमधील उमरगा येथील रहिवासी आहे. त्याला सीआयपीसी कलम ४१(अ)१ अंतर्गत नोटीस देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.