मुंबई : गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून एका तोतयाने वडाळा येथील एका तरुणाची ५० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – इमारतीमध्ये जाण्यास रोखल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या
वडाळ्यातील भीमवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या अंगनल जॉर्ज राजा (३३) याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. गुन्हे शाखेने तुमचे पार्सल ताब्यात घेतले असून यामध्ये काही अनधिकृत वस्तू सापडल्या आहेत, असे त्याला सांगण्यात आले. आपण कुठलेही पार्सल पाठवले नसल्याचे त्याने सदर व्यक्तीला सांगितले. मात्र यामध्ये नाव, पत्ता आधारकार्डची सर्व माहिती असल्याने तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची भीती आरोपीने तरुणाला घातली. या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आरोपीने तरुणाला एक लिंक पाठवली. या लिंकवर जाताच तरुणाच्या खात्यातील ५२ हजार रुपये हस्तांतरित झाले. यावेळी खात्री करण्यासाठी आरोपीने तरुणाला व्हिडीओ कॉल सुरू ठेवण्यास सांगितले. मात्र पैसे मिळताच आरोपीने फोन बंद केला. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आहे. त्याने याबाबत सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत वडाळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
© The Indian Express (P) Ltd