मुंबई : हुतात्मा चौकातील ऐतिहासिक इस्माईल बिल्डिंगमध्ये २०१७ मध्ये सुरू झालेले आणि जगभरात स्पॅनिश फॅशन ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या झाराच्या आलिशान दुकानाला सोमवारी टाळे लावण्यात आले. त्यामुळे, मुंबईतील फॅशनच्या दुनियेतील एका युगाचा अंत झाल्याचे म्हटले जात आहे.

इंडिटेक्स आणि टाटा समुहाच्या ट्रेंट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून ऐतिहासिक इस्माईल इमारतीच्या ५१,३०० चौरस फूट अशा विस्तीर्ण क्षेत्रफळावर झाराचे भारतातील पहिले आलिशान दुकान २०१७ मध्ये सुरू झाले होते. तसेच, त्यामुळे मुंबईतील किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडला होता. झाराच्या आलिशान दुकानामुळे ऐतिहासिक इस्माईल इमारतही पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र झाली होती. तथापि, दुकान बंद करण्याच्या निर्णयामागील कारणांची चर्चा सुरू झाली आहे.

दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरातील वास्तुशिल्पाचा वारसा असलेली इस्माईल बिल्डिंग गेल्या एका शतकाहून अधिक काळ या परिसराचे वैभव मानली जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही ऐतिहासिक इमारत बांधली गेली होती व सर इस्माईल युसुफ ट्रस्टच्या नावावरून या इमारतीचे नाव इस्माईल बिल्डिंग ठेवण्यात आले. सर इस्माईल युसुफ हे ट्रस्टचे संस्थापक होते आणि ब्रिटिश काळात मुंबईतील प्रमुख जमीनदार होते. मुंबईत त्यांच्या मालकीच्या अनेक वारसा वास्तू आहेत. एडवर्डियन निओ-क्लासिकल शैलीमध्ये बांधण्यात आलेली ही पाच मजली इमारत त्या काळातील स्थापत्यकलेचे एक प्रतीक मानले जाते व ब्रिटिश वसाहती वास्तुकलेचा प्रभाव प्रतिबिंबित करते.

झाराने मुंबईतील आपले पहिले आलिशान दुकान सुरू करण्यासाठी या इमारतीची निवड करण्यापूर्वी तेथे काही गृहनिर्माण बँका आणि कार्यालये कार्यरत होती. परंतु, या दुकानांची जागा झारा या प्रतिष्ठित ब्रँडच्या आलिशान दुकानाने घेतली. या परिवर्तनासाठी आणि इस्माईल इमारतीच्या संरचनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी वास्तुविशारद कीर्तिदा उन्वाला आणि मोना संघवी यांच्यासह झाराच्या चमूने दोन वर्षे अथक काम केले. त्यात सूक्ष्म जीर्णोद्धार आणि आधुनिक किरकोळ पायाभूत सुविधांचा समावेश करताना इमारतीचे मूळ सौंदर्य जपण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. काळानुसार निस्तेज झालेले हिरवे बेसाल्ट आणि चुनखडीचे स्तंभ काळजीपूर्वक स्वच्छ करण्यात आले. तसेच, बाहेरून सुशोभित दर्शनी भाग जतन करण्यात आला.

झाराने २०१७ मध्ये तेथे भारतातील पहिले स्वतंत्र स्ट्रीट स्टोअर उघडून इतिहास घडवला. त्याच्या नेहमीच्या मॉल-आधारित आउटलेटपासून दूर जात ब्रँडने दक्षिण मुंबईच्या किरकोळ क्षेत्रात गुंतवणूक केली आणि त्यामुळे इस्माईल बिल्डिंगही प्रकाशझोतात आली. झारा बंद झाल्याने इस्माईल बिल्डिंगचे भविष्य अनिश्चित झाले आहे. ही ऐतिहासिक इमारत जपली जाईल की ती दुर्लक्षाचा बळी ठरेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Story img Loader