मुंबईतून एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. एका मुंबईकर महिलेने टाटा मेमोरियल रुग्णालयाला तब्बल १२० कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. केमो सेंटर सुरु करण्यासाठी या महिलेने रुग्णालयाला ही जागा दान केली आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेली ही जमीन आता रुग्णालयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे याचसोबत इतर १८ देणगीदारांकडून देखील टाटा रुग्णालयाच्या केमो सेंटरच्या बांधकामासाठी १८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार करणारं देशातील सर्वात मोठं रुग्णालय आहे. त्यामुळे, देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इथे येत असतात. रुग्णांच्या मोठ्या संख्येने निश्चितच रुग्णालयातील यंत्रणेवर मोठा ताण असतो. त्यापैकी नव्या केमोथेरपी सेंटरचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता मार्गी लागणार आहे. कारण, मुंबईच्या ६१ वर्षीय दीपिका मुंडले यांनी आपली वडिलोपार्जित अंदाजे १२० कोटी रुपये किंमतीची असलेली ३० हजार चौरस फुटाची जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे.
१९ मुंबईकरांनी केलं दान
अन्य १८ देणगीदारांसह आता टाटा रुग्णलयासाठी एकूण १९ मुंबईकरांनी दान केलं आहे. ही निश्चितच अत्यंत सकारात्मक बाब आहे. सध्या या रुग्णालयात केमोथेरपीसाठी १०० बेड उपलब्ध आहे. मात्र, असं असलं तरीही दररोज इथे तब्बल ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते. परंतु, मुळातच रुग्णांची संख्या जास्त असल्याने सद्यस्थितीत रुग्णांना केमोथेरपीसाठी ३० दिवस वाट पहावी लागत आहे. दरम्यान, आता या नव्या केमोथेरपी सेंटरच्या उभारणीनंतर निश्चितच हा ताण तुलनेने मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि जास्तीत जास्त रुग्णांना उपचार घेता येतील अशी अपेक्षा आहे.
टाटा मेमोरियल रुग्णालयाची स्थापना
१९३२ साली मेहेरबाई टाटा यांचं रक्ताच्या कर्करोगाने निधन झालं. त्यांचे पती दोराबजी टाटा यांना त्यानंतर भारतात देखील आपल्या पत्नीवर उपचार केलेल्या रुग्णालयासारखंच एक रुग्णालय उभं करायचं होतं. पुढे दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे उत्तराधिकारी नोरोजी सकलटवाला यांनी प्रयत्न केले. अखेर जेआरडी टाटा यांच्या पाठिंब्याने २८ फेब्रुवारी १९४१ साली मुंबईतील परेल भागात टाटा मेमोरियल रुग्णालयाची सात मजली इमारत उभी राहिली.
कर्करोगग्रस्तांवर उपचार करणारं देशातील सर्वात मोठं रुग्णालय असल्याने टाटा मेमोरियल रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारांसाठी मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. माहितीनुसार, या रुग्णालयात देशातील एकूण कर्करोगग्रस्तांपैकी जवळपास एक तृतीयांश रुग्णांवर उपचार केले जातात. इतकंच नव्हे तर या रुग्णालयात प्राथमिक चिकित्सेसाठी आलेल्या ६० टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.