मुंबई : मुंबईमध्ये गोवरच्या साथीचा उद्रेक झाला असताना गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर खोकला आणि घशाच्या खवखवीने हैराण झाले आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील वातावरणातील बदलामुळे सध्या खोकला, घशाची खवखव याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. त्यामुळे घशाची खवखव व खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
मुंबईमध्ये सध्या रात्री थंडी तर दिवसा कडक उन्हाळा असे वातावरण आहे. या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून मुंबईतील नागरिकांच्या घशात खवखव वाढली असून, त्यांना खोकल्याचा त्रास होत आहे. तसेच अनेकांना खोकला व सर्दीचा त्रास होत आहे. खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडे घशातील खवखव व खोकल्याच्या रुग्णांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या कान-नाक-घसा रुग्णालयामध्ये दररोज ४०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. मात्र काही दिवसांपासून यामध्ये घशाची खवखव, खोकला, सर्दी यासारख्या आजाराने त्रस्त असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात येत असून, हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जे. जे. रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागामध्ये काही दिवसांपासून घशाची खवखव, खोकला या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नेहमीच्या रुग्णांच्या तुलनेत २० टक्के रुग्ण हे घशाची खवखव, खोकल्याचे येत आहेत. मात्र यामध्ये काही रुग्णांना ॲलर्जीचे असून, काही रुग्ण हे करोनोत्तर आहेत. या रुग्णांना सुक्या खोकल्याचा त्रास होत आहे. सध्या बदलत असलेले वातावरण, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम आणि हवेतील परागकण यामुळे नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा गर्मी तर रात्री थंडी असे वातावरण असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मुंबईतील नागरिकांच्या घशामध्ये खवखव, खोकला, सर्दी यारखे आजार दिसून येत आहेत, अशी माहिती जे.जे. रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिली. वातावरणातील बदलामुळे येणाऱ्या रुग्णांबरोबरच करोनामुक्त झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. करोनामधून बरे झालेल्या रुग्णांना खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे हे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. या रुग्णांना जीवनसत्त्व अ, मल्टीव्हिटामिन, प्रतिजैविके आणि ॲलर्जीविरोधी औषधे देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा: सावरकरांवरील विधानावरून काँग्रेस- शिवसेनेत दरी
त्रास होण्याची कारणे
बदलते वातावरण, मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम, हवेतील परागकण
कोणती काळजी घ्याल ?
- घशाला खवखव सुरू होताच तातडीने डॉक्टरांकडे जा
- नाक व तोंडावर मास्क वापरा
- गरम पाण्याने गुळण्या करा
- डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे