मुंबई : मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकाडा सहन करावा लागला. सांताक्रूझ येथे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमान ४.६ अंशांनी अधिक नोंदले गेले. दरम्यान, शनिवारीही कमाल तापमानाचा पारा चढा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे शुक्रवारी दिवसभर नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. सांताक्रूझ येथे शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा…उलवे येथील बालाजी मंदिर भूखंड प्रकरण : हरित लवादाकडून तिरुपती संस्थानला १० हजारांचा दंड
मुंबईत पहाटेचा गारवा देखील कमी झाला आहे. दरम्यान, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ शनिवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झाली आहे.
हेही वाचा…बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, बेस्ट बस सेवेवर परिणाम
राज्यातील इतर भागातही गारव्याने प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या तापमानातील चढ – उतार पुढील एक दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. आग्नेय अरबी. समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच उत्तर भारतात पश्चिमेकडून जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. राज्यातील किमान तापमानातील वाढ कायम असल्यामुळे पहाटेचा गारवा कमी झाला आहे.