मुंबई : किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ही स्थिती पुढील एक – दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानाच्या तुलनेत नोंदले जाणारे तापमान हे एक ते दोन अंशानी अधिक आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी कमाल तापामानाने ३२.८ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. याचवेळी किमान तापमानात मात्र घट झाली होती. सांताक्रूझ येथे मंगळवारी १८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. कमाल तापमानाचा पारा चढा असला तरी किमान तापमानाच्या पाऱ्यातील घट सलग दुसऱ्या दिवशीही कायम होती. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी १६.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला.

उकाड्यात वाढ झाली असली, तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास गारवा जाणवत आहे. त्यातच पुढील एक – दोन दिवस मुंबईत किंचीत थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तरेकडील थंड वारे फक्त उत्तर व उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंत पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पहाटे किमान तापामानात काहीशी घसरण होऊन मुंबईत किंचिंत थंडी जाणवेल. मुंबईबरोबरच नाशिक, अकोला, छत्रपती संभाजीनगर या भागातही थंडी अनुभवता येईल. तापमानात सातत्याने होणाऱ्या या बदलांमुळे मुंबईकरांना थंडीसह उकाड्याचाही अनुभव घ्यावा लागणार आहे. या आठवड्यात संपूर्ण दिवसभर आकाश निरभ्र राहील, तसेच या कालावधीत कमाल तापामान ३३ ते ३५ अंशापर्यंत राहील तर, किमान तापमान १६ ते १९ अंशादरम्यान राहील.

मागील काही दिवसांत वाऱ्यांची वारंवार बदलणारी दिशा तसेच कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन राज्यावर टिकून राहिले होते. याशिवाय अधून-मधून महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांनी उत्तरेतील थंड वाऱ्यांचा अटकाव केला. परिणामी उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचले नाहीत. त्यामुळे दिवसभर निरभ्र आकाश असूनही जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी अनुभवता आली नाही. यामुळे पहाटेच्या किमान तापमानातही १ ते २ अंशानी वाढ झाली होती.

यंदा जानेवारी महिन्यातच कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली नाही. त्यानंतर काही दिवस किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्याने पहाटेचा गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला. मात्र, कमाल तापमानातील वाढ कायम असल्यामुळे दिवसभर मात्र असह्य उकाडा सहन करावा लागला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला काही अंशी तापमानात घट झाल्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikars facing extreme weather conditions like cold at night and heat in the morning mumbai print news zws