का होते वाहतूक कोंडी?
मुंबई : मुंबईतून रस्ते मार्गे नवी मुंबई, पनवेल आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकाना ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाशी टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत आहे. परिणामी, चेंबूर ते वाशी टोलनाक्यादरम्यानचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना तासभर कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
नागरिकांची वाहतूक कोंडीतून काही अंशी सुटका करण्यासाठी मुंबईत अनेक भागात युद्धपातळीवर मेट्रोची कामे सुरू आहेत. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत असून या कामामुळे अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. शीव-पनवेल मार्गावरील चेंबूर, देवनार आणि मानखुर्द परिसरातही गेल्या चार वर्षांपासून ‘मेट्रो २ बी’चे काम सुरू आहे. चेंबूर उमरशी बाप्पा चौक ते डायमंड उद्यान दरम्यानचे काम दोन वर्षे रखडले होते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.
हेही वाचा >>> अशा पळविल्या मोटारगाड्या…; साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक
मेट्रोचे डायमंड उद्यानापासून मानखुर्दपर्यंत काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून सध्या येथील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र मानखुर्द रेल्वे पुलावर सध्याही काम सुरू असून या कामामुळे, तसेच येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच मानखुर्द जकात नाक्यापर्यंत काही प्रमाणात रस्ता मोकळा मिळतो. मात्र वाशी टोल नाक्यामुळे वाशी खाडीपुलापर्यंत वाहतूक कोंडी होत असून हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चेंबूर ते वाशी टोलनाका हे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांचे आहे. मात्र मेट्रोचे काम आणि टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे हे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना तासाभराचा अवधी लागत आहे. शनिवार आणि रविवारी तर काही वेळा टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका मानखुर्दपर्यंत बसत आहे. परिणामी, मानखुर्द येथून वाशी टोल नाक्यावर पोहोचण्यासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. परिणामी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होतो. त्यामुळे कोंडी वाढल्यास टोल नाका तत्काळ वाहनांसाठी खुला करावा अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.