लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा बहुचर्चित पुर्नविकास प्रस्ताव रेसकोर्सच्या व्यवस्थापनाने मंजूर केला असला तरी याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. या पुनर्विकास प्रस्तावाला नार्वेकर यांनी विरोध केला आहे. मकरंद नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) १७१८ सदस्यांपैकी केवळ ५४० सदस्य रेसकोर्सचे भवितव्य ठरवू शकत नाहीत, अशी भूमिका नार्वेकर यांनी घेतली आहे.
महालक्ष्मी येथील मोक्याच्या जागी असलेल्या रेसकोर्सच्या पुनर्विकासाचा बहुचर्चित प्रस्ताव रेसकोर्सच्या व्यवस्थापनाने गेल्या महिन्यात ३० जानेवारी रोजी मंजूर केला. पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूने ५४० (७६.२७ टक्के) मते पडली, तर प्रस्तावाच्या विरोधात १६८ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे या रेसकोर्सच्या भाडेकराराचे नूतनीकरण करण्याचा व रेसकोर्सच्या २२६ एकर जागेपैकी १२० एकर जागा पालिकेला संकल्पना उद्यान (थीम पार्क ) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र केवळ साडे पाचशेसदस्यांनी मतदान केले म्हणजे शहरातील नागरिकांची या प्रस्तावाला मान्यता आहे असा अर्थ होत नाही अशी मत मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केले होते. त्यावर पालिका प्रशासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यानंतर आता नार्वेकर यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून महालक्ष्मी रेसकोर्सचे भवितव्य मुंबईकरांच्या सार्वमताने (रेफरंडम) ठरवावे, आणि नागरिकांचे या विषयावर मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे.
आणखी वाचा-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार!
रेसकोर्सच्या प्रस्तावित पुनर्विकासासाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या ५०० सदस्यांची मान्यता पुरेशी नाही. ही जमीन मुंबईकरांची असून, त्यांची मते सर्वात महत्त्वाची आहेत, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. पालिका प्रशासन जर सार्वमत घेण्यात अपयशी ठरले, तर लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे.