लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे – वरळी सागरी सेतूदरम्यान आकाराला येत असलेल्या सागरी किनारा मार्गामुळे मुंबईकरांना ७.५ किलोमीटर लांबीचा नवीन सागरी पदपथ मिळणार आहे. हा पदपथ लांबीने मरिन ड्राईव्ह येथील पदपथापेक्षा मोठा असेल. या पदपथालगत समुद्री भिंत बांधण्यात येणार असून त्यामुळे सागरी किनारा मार्गाचे संरक्षण होणार आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी किनारा मार्गाचे बांधकाम वेगात सुरू आहे. सागरी किनारा मार्गाला समांतर असा समुद्री पदपथ बांधण्यात येणार असून हा पदपथ ७.५ किमी लांब व तब्बल २० मीटर रुंद असणार आहे. या पदपथावर मरिन ड्राइव्हप्रमाणेच बसण्यासाठी दगडाची सलग व्यवस्था असेल. भरतीच्या लाटांपासून संरक्षणासाठी या समुद्री पदपथाला लागून सागरी भिंत (सी वॉल) बांधण्यात येत आहे. जानेवारी २०२० मध्ये या भिंतीचे बांधकाम सुरू झाले असून आता ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

आणखी वाचा-सागरी किनारा मार्ग नोव्हेंबपर्यंत पूर्ण करणे आव्हानात्मक

ही समुद्री भिंत उभारण्यासाठी नवी मुंबईजवळील उलवे येथील खाणीतील आर्मर रॉक या नैसर्गिक दगडांचा वापर करण्यात आला आहे. एका दगडाचे वजन एक ते तीन टन इतके असून प्रचंड वेगाने धडकणाऱ्या लाटा पेलण्याची क्षमता या दगडांमध्ये आहे. मरिन ड्राईव्ह येथे असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या टेट्रापॉडऐवजी हे दगड वापरण्यात आले आहेत. टेट्रापॉडमध्ये सागरी जीवसृष्टी विकसित होत नाही, मात्र आर्मर रॉक हे नैसर्गिक असल्यामुळे सागरी जीवसृष्टी प्रवाळ यांच्यासाठीही ते सुरक्षित आहेत, अशी माहिती सागरी किनारा मार्गाचे अभियंता विजय झोरे यांनी दिली.

समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीचा विचार करून ही समुद्री भिंत उंचावर बांधण्यात आली आहे. तसेच त्याला लागून असलेल्या सागरी मार्गाची उंचीही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात भरतीच्या वेळी लाटा रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. लाटांचे पाणी रस्त्यावर आले तरी ते पर्जन्य जलवाहिन्यांमधून वाहून जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

वीस मीटर रुंदीचा समुद्री पदपथ आणि त्यापुढे १७ मीटर रुंदीची जाणारी एक मार्गिका आणि मग १० मीटर रुंदीचा मध्यभाग आणि पुन्हा १७ मीटर रुंदीची येणारी मार्गिका असा हा विस्तीर्ण रस्ता असणार आहे.

असा आहे कोस्टल रोड

रस्त्याची लांबी – १०.५८ कि.मी.
मार्गिका संख्या – ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)
भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी – ४.३५ कि.मी.
पुलांची एकूण लांबी – २.१९ कि.मी.
बोगदे – दुहेरी बोगद्यांची लांबी – प्रत्येकी २.०७ कि.मी., ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)

प्रकल्पाचे इतके काम पूर्ण

बोगदा खणन – १०० टक्के पूर्ण
भराव – ९५ टक्के पूर्ण
समुद्रभिंत – ८४ टक्के पूर्ण
आंतरबदल – ५७ टक्के पूर्ण
पूल – ६० टक्के पूर्ण

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikars will get a 7 and half km long sea walkway through the sagri kinara marga mumbai print news mrj
Show comments