मुंबई : मुंबईतील हवेचा निर्देशांक बुधवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला असून शिवडी, वरळी तसेच वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता मंगळवारीही मध्यम श्रेणीत होती. ‘समीर’ ॲपनुसार बुधवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११४ वर पोहोचला होता.

मुंबईत सध्या आर्द्रता असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात. समीर ॲपच्या नोंदीनुसार, बुधवारी सकाळी शिवडी येथील हवा निर्देशांक २२६, तर वरळी येथील २२५ इतका होता. तसेच खेरवाडी-वांद्रे २०५, वांद्रे -कुर्ला संकुल हवा निर्देशांक २२५ इतका होता. दरम्यान, मंगळवारी देखील सायंकाळी हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली होती.

हेही वाचा…माथेरानच्या राणीची आजपासून सफर

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते. भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान ,पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

हेही वाचा…प्रमुख पक्षांकडून ‘वरळी’कर उमेदवारच नाही

हवेचा दर्जा ढासाळल्याने काळजी काय घ्यावी ?

प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.