लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांना गेल्या पालिका निवडणूकीच्यावेळी दिलेली आश्वासन पूर्ण न केल्यामुळे डबेवाला संघटनेने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेची निवडणूक या वर्षभरात होण्याची शक्यता असून डबेवाल्यानी त्याआधीच आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या वेळी वचननाम्यामध्ये मुंबईतील डबेवाल्यांनसाठी काही आश्वासने दिली होती. त्यापैकी फक्त डबेवाला भवनाव्यतिरिक्त दुसरे कोणतेच आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे डबेवाला कामगारांमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याची प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.
तळेकर यांनी म्हटले आहे की, मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची पाच वर्षे सत्ता होती. काही काळ उध्दव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. तरीही वचने पूर्ण झाली नाहीत. आपण अनेकदा याबाबत उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले पण काहीही कार्यवाही झाली नाही. जर आश्वासन पूर्ण करायची नव्हती तर ती आश्वासने त्यांनी द्यायलाच नको होती, अशी सर्व साधारण भावना डबेवाला कामगारात असल्याचेही तळेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर डबेवाला संघटनेने उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मात्र येत्या पालिका निवडणूकीच्या तोंडावर डबेवाला संघटनेने अशी जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे ही नाराजी ठाकरेना भोवणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
कोणती आश्वासने दिली होती
१) मुंबईतील डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणार.
२)या कंपनीला पहिल्या वर्षी किमान ५ कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ देणार.
३)सायकल खरेदी/पार्किंगसाठी सहकार्य,मुलांचे शिक्षण,कुटुंबाला आरोग्यसेवा देण्यासाठी कार्पोरेट व सामाजिक विभागां मार्फत मदत,
४) कार्यालयासाठी तसेच विश्रांतीसाठी मुंबईत डबेवाला भवन बांधणार.