मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई शहर, तसेच उपनगरांतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे शनिवारी ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पारा अधिक असल्याने उन्हाच्या झळा बसत होत्या. अशीच स्थिती पुढील एक – दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. मुंबईत शनिवारी दुपारी २ ते ३ दरम्यान उन्हाच्या झळा अधिक होत्या. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. दरम्यान, किमान तापमानात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आणखी घट झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा चढा असल्याने दिवसभर मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागला. पुढील एक – दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहील, त्यानंतर कमाल तापमान ३० – ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ – १८ अंश सेल्सिअस इतके असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा…कुर्ला उन्नत हार्बर मार्गाचे स्वप्न आणखी एक वर्ष लांबणीवर

राज्यातील काही भागात किमान तापमानाच्या पाऱ्यात घट व्हायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील किमान तापमानाचा पारा चढा होता. मात्र, दोन दिवसांपासून किमान तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी – अधिक होत आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापमान ११ अंशाखाली नोंदले गेले. सकाळी काही भागात धुके पडत आहे. तर दुपारी उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, राज्यामधील तापमानातील चढ – उतार पुढील दोन – तीन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा…बँकॉकवरून आणलेला सव्वाचार कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त, दोन प्रवाशांना अटक

घाटकोपर येथील हवा ‘अतिवाईट’

मागील अनेक दिवसांपासून मुंबईची हवा खालावलेली आहे. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र तरीही काही भागातील हवा अद्याप ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शनिवारी सायंकाळी घाटकोपर येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३१० इतका होता. तेथे पीएम २.५ धुलीकणांची मात्रा अधिक होती. असे वातावरण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. गोवंडीतील शिवाजीनगर आणि कुलाबा नेव्हीनगर येथेही काही दिवस ‘वाईट’ हवेची नोंद झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais maximum temperature rise with santacruz recording 35 celsius on saturday mumbai print news sud 02