मुंबई : मुंबईचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेले तापमान आणि दमट वातावरणामुळे उन्हाचा असह्य त्रास मुंबईकरांना होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत उष्ण व दमट वातावरण असेच राहणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानात वाढ होणार नसली, तरी दिवसभर मुंबईकरांना उकाडा सहन करण्यावाचून पर्याय नाही. गेले अनेक दिवस मुंबईत उन्हाचा ताप, तसेच उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३८.६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाही होत आहे. उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी टोपी, छत्रीचा वापर सुरू केला आहे. याशिवाय, दुचाकीवरून फिरतानाही स्कार्फ, रुमालाने चेहरा झाकून घेऊन नागरिक प्रवास करत आहेत. दुपारच्या उन्हात शक्यतो घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहेत. पुढील दोन महिन्यांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारच्या तुलनेत तापमानात काहीशी घट झाली असली, तरी दिवसभर गरम हवा आणि उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. वाऱ्याच्या प्रतिचक्रीय स्थितीमुळे पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे सक्रिय झाले असल्याने सध्या मुंबईत तापमानावाढ आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
आर्द्रतेचे प्रमाण अधिक, आरोग्य समस्यांतही वाढ
दरम्यान, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होतो. घामामुळे शरीरातील पाणी निघून जात असल्याने गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. अंगाला चटके देणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. या कडक उन्हामुळे मुंबईकरांचे आरोग्यदेखील बिघडत असून ताप, सर्दी, डोकेदुखी याखेरीज डोळे कोरडे होणे, पोटदुखी अशा त्रासांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. तसेच उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे याबरोबरच शरीरात रूक्षता जाणवण्यासारख्या समस्याही वाढीस लागल्या आहेत.
तापमानाचा पारा फारसा चढणार नसला तरी सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. साधारणपणे होळीनंतर ऊन वाढते. मात्र, यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा लागत आहेत. तापमानात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मंगळवारी कोकण विभागात सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरी येथे झाली होती. मुंबईबरोबरच राज्यातील इतर भागांतही उन्हाचा ताप वाढला आहे. बहुतांशी भागांत तापमान ३७ अंशाच्या पुढे आहे.
अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी अकोला येथे झाली. तेथे ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मंगळवारीदेखील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली होती.
राज्यातील तापमानवाढ कायम राहणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी अकोला, चंद्रपूर भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर देशातील किमान तापमानातही वाढ झाली आहे.