मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे, मात्र यासोबतच आर्द्रतेतही वाढ होण्याचा अंदाज आहे.सध्या मुंबईत उकाडा आणि उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. आता पुढील तीन – चार दिवस आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवेल, आणि विशेषतः सकाळी व संध्याकाळी अधिक घाम येण्याची शक्यता आहे. सामान्यतः एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा चढतोच, मात्र यंदा आर्द्रतेत होणारी वाढ ही मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, मुंबईच्या तापमानाचा पाराही पुढील काही दिवस चढाच राहणार आहे.

यामुळे मुंबईकरांना उन्हाचा तडाखाही सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या तापमानात सोमवारपासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवेची द्रोणीय स्थिती तयार होत आहे. यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. तापमानातील ही वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाडा आणि उन्हाचा ताप यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मे महिन्यात मुंबईतील स्थिती काय असेल ही चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होत आहे.

आर्द्रतेचा परिणाम

– आर्द्रतेमुळे शरीरातून घाम बाहेर पडतो, पण वाफेच्या स्वरूपात हवेत शोषून घेतला जात नाही, त्यामुळे शरीर थंड होत नाही आणि उष्णता अधिक जाणवते.

– दमट हवामानामुळे घाम व उष्णतेमुळे निर्जलीकरणाचा धोका

– दम लागणे, अशक्तपणा, त्वचेच्या त्रासांमध्ये वाढ

– वृद्ध, लहान मुले व हृदय विकाराचा आजार असणाऱ्यांना त्रास

काळजी काय घ्यावी

– भरपूर पाणी प्या, तहान लागण्याची वाट न पाहता दर अर्ध्या तासाने थोडे पाणी प्या.

– नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, फळांचे रस हे नैसर्गिक पेय घ्या.

– चहा, कॉफी शक्यतो टाळा

– हलके, सैलसर, सूती कपडे घाला.

– टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.

विदर्भात वादळी पावसाचा इशारा

राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटी पासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही प्रणाली पोषक ठरत असल्याने राज्यात अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे, १०५ टक्के पाऊस पडेल असा दीर्घकालीन अंदाज वर्तविण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांत मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामानविषयक स्थिती अनुकूल राहील. राज्याचा विचार करता, दक्षिण कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. गतवर्षी १०६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला होता,मात्र प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस झाला.