देशात प्रथमच ‘मोनो पाइल’ तंत्रज्ञानाचा वापर; खर्चासोबत पर्यावरण हानीतही घट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलांखाली १७६ खांबांची उभारणी के ली जाणार आहे. भारतात पहिल्यांदाच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाइल) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून सुरुवातीला ३ चाचणी स्तंभांची उभारणी करण्यात येणार असून यासाठीच्या कार्यवाहीस नुकतीच सुरुवात झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या सागरी किनारा मार्गातर्गत साधारणपणे ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २ हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर एकूण १५.६६ किलोमीटर लांबीचे आंतरबदल (इंटरचेंज) देखील बांधण्यात येणार आहेत. हे पूल उभारताना परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करून या १७६ खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे ४ आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागेल. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर करण्यासह खर्च व वेळ अधिक लागू शकला असता, मात्र एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वपर्यंत एकच खांब असणार आहेत. त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या ७०४ वरून १७६ इतकी कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होईल आणि पर्यावरणाला धोका कमी असेल. तसेच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत व खर्चात बचत शक्य होणार आहे.

या बांधकामासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री युरोपातून आणण्यात आली असून, अशाप्रकारचे तंत्रज्ञान अमलात आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव असणारे परदेशातील कुशल तंत्रज्ञ या कामी स्वत: उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत, अशी माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली आहे. एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार प्रत्यक्ष स्तंभांचे बांधकाम पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर २०२१ नंतर सुरुवात होईल, अशीही माहिती मराठे यांनी दिली आहे.

वरळीत तीन चाचणी स्तंभ

एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर भारतात पहिल्यांदाच होणार असल्याने प्रत्यक्ष बांधकामापूर्वी ३ चाचणी स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या स्तंभांची जमिनीखालील व जमिनीवरील एकूण उंची ही सुमारे १८ मीटर इतकी असणार आहे. वरळी परिसरातील अब्दुल गफार खान मार्गावर असणाऱ्या बिंदू माधव ठाकरे चौकानजीकच्या सागरी किनारा मार्गाच्या जागेत या स्तंभांची उभारणी करण्यात येणार आहे.

एकल स्तंभम्हणजे काय?

सामान्यपणे समुद्र, नदी, तलाव इत्यादींवर पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणाऱ्या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ (ग्रुप पाइल) पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे साधारणत: ४ स्तंभ उभारण्यात येतात. मात्र, एकल स्तंभ (मोनो पाइल) पद्धतीमध्ये त्याऐवजी खालपासून वपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो. यानुसार सागरी किनारा प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुलांखाली १७६ स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

१७६ एकल स्तंभांची उभारणी

२.५ ते ३.५  मीटर व्यास

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais sea link bridge pillars to bebuilt using mono pile technology zws
Show comments