लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ऋतुबदलाच्या काळात सध्या किमान आणि कमाल तापमानाचा पारा वाढत असून मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ३७ अंशांपार पोहोचला. सांताक्रूझ येथे शनिवारी ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील काही दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत शनिवारी सांताक्रूझ येथे ३७.२ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान सरासरीपेक्षा ५.२ अंशांनी अधिक नोंदले गेले. मात्र, याआधी फेब्रुवारीमध्ये कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपारही पोहोचला आहे . सांताक्रूझ येथे २०२३ मध्ये ३७.९ तर २०२० मध्ये ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. दिवसभर उकाडा आणि दुपारी उन्हाचा चटका यामुळे दुपारी घराबाहेर फिरणाऱ्या मुंबईकरांना शनिवारी वातावरणातील बदलांचा अधिक त्रास सहन करावा लागला. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही मागील दोन दिवसांपासून वाढ होत आहे. यामुळे पहाटेचा जाणवणारा गारवा आता नाहीसा झाला आहे.

दरम्यान, सध्या सायंकाळनंतर उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. तर दिवसा पूर्वेकडून वारे येत असल्यामुळे तापमानाचा पारा चढा राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईबरोबरच रत्नागिरी, ठाणे या भागातही तापमानाचा पारा चढा होता. रत्नागिरी येथे ३८.४ अंश सेल्सिअस, तर ठाणे येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पालघर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

पालघर येथे शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. येथे कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्याखालोखाल सोलापूर, परभणी, जळगाव या भागातही तापमानाचा पारा चढा होता. दरम्यान, राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत. ही वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.