लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गेले काही दिवस चढ उतार होत असलेला मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागला आहे. दिवसाच्या तसेच रात्रीच्या तापमानात देखील तुलनेने वाढ झाली आहे. दरम्यान, सध्याचा काळ हा ऋतू बदलाचा असून उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे.

जानेवारी महिन्यात काही दिवस गारवा अनुभवता आला. त्यानंतर कमाल तापमान ३० ते ३४ अंशाच्या आसपास असून किमान तापमानात देखील हळूहळू वाढ होत आहे. सध्या दिवसा शहरात उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. तर, रात्री उकाडा जाणवत आहे. दर दोन दिवसांनी कमाल आण‌ि किमान तापमानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांना त्या बदलांचा त्रास होताना दिसत आहे. सध्याचा काळ हा तापमान बदलाचा काळ असून वाऱ्यांच्या दिशेमुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे तर किमान तापमान किंचित चढे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच फेब्रुवारी महिन्यादरम्यान ऋतू बदलाची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळेच तापमानात मध्येच वाढ दिसून येत असल्याचे सांगितले.

दरम्यान, पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३६ अंशादरम्यान राहील. यावेळी दिवसा उन्हाचा चटका जाणवेल. तसेच उकाड्याची देखील जाणीव होईल. यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आण‌ि उपनगराचे तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने मुंबईकरांना चांगलाच घाम फुटला आहे. शनिवारी, ३४.५ सांताक्रूझमध्ये ‌कमाल तापमान नोंदले गेले. सध्या वाढलेले तापमान ही उन्हाळ्याची चाहूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले. तसेच सध्या कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे.

यंदा जानेवारी महिन्यातच कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात देखील मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली नाही. त्यानंतर काही दिवस किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्याने पहाटेचा गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला. मात्र, कमाल तापमानातील वाढ कायम असल्यामुळे दिवसभर मात्र असह्य उकाडा सहन करावा लागला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला काही अंशी तापमानात घट झाल्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानाचा पारा अजूनही कमी आहे‌. मात्र, कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे ही उन्हाळ्याची चाहूल आहे. येत्या एक दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.