पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून काढला जाणारा गाळ टाकायचा कुठे हा यक्षप्रश्न सध्या पालिका अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आपल्यावरील ही जबाबदारी झटकण्यासाठी अधिकारी भलत्यासल्या निविदा काढून ठेकेदारांवर दबाव टाकू लागले आहेत. परंतु पालिकेलाच गाळ टाकायला जागा नाही तिथे ठेकेदार कुठून जागा उत्पन्न करणार असा सवाल विचारला जात आहे.महापालिकेत शुक्रवारी ‘अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प’ या विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मागील वर्षांत पालिकेने पावसाळ्यापूर्वी तीन लाख क्युबिक मीटर क्षेत्रात ४ लाख टन गाळ काढल्याची माहिती देण्यात आली. हा गाळ काढण्यासाठी सुमारे १५३ कोटी रुपये खर्च झाले. परंतु ज्या डम्पिंग ग्राऊंडवर गाळ टाकण्यात येत होता त्या तीनही ग्राऊंडची क्षमता संपल्याने त्या ठिकाणी गाळ न टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यातच आसपासच्या पालिकांनीही त्यांच्या परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर गाळ टाकण्यास परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत यावर्षी गाळ कुठे टाकायचा असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे.
४०० पेटय़ा ठेवणार
गाळाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिका आणखी ४०० ठिकाणी कचरा पेटय़ा ठेवणार आहे. असे असले तरी दरवर्षी निघणाऱ्या गाळाचे प्रमाण पाहिले तर हा प्रश्न पालिकेसाठीही डोकेदुखी झाला आहे. त्यामुळे त्यातून तोडगा काढण्यासाठी पालिकेने नामी शक्कल लढवत निविदेमध्ये ही जबाबदारी ठेकेदारावर टाकण्याचा विचार सुरू केला आहे. पण ज्या ठिकाणी पालिकेला गाळ टाकण्यासाठी जागा मिळत नाही तिथे ठेकेदार कुठून गाळासाठी जागा उत्पन्न करणार असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. यावर पालिकेतील वरिष्ठ अधिकारी सध्यातरी गोलमाल उत्तरे देत आहेत. त्यामुळे गाळाचा निर्णय सध्या तरी गाळातच असल्याचे चित्र आहे.

Story img Loader