शरद राव यांचा आजपासून संप
पाणी पुरवठा, बेस्ट, रिक्षा यांसह विविध कर्मचारी संपावर
मुंबईकरांना वेठीला धरणारा कामगार नेते शरद राव यांनी पुकारलेला तीन दिवसांचा संप सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होत आहे. राव यांनी संपाची हाक आधीच दिलेली असली तरी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे या संपामुळे मुंबईकरांच्या हालात भर पडणार आहे.
या आंदोलनात पाणी-पुरवठा विभाग, साफसफाई विभागातील कर्मचारी, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच बेस्टचे कर्मचारी सामील असल्याने या संपाचा मोठा फटका मुंबईकरांना बसणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणतीही चर्चा न करणाऱ्या राव यांनी त्यांना फक्त निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनीही चर्चेसाठी वेळ देऊन, तसेच संप करून नागरिकांना वेठीस धरू नये, अशी विनंती करूनही राव यांचा आंदोलनाचा निर्णय कायम आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुन्हा एकदा राव यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. मात्र राज्यात बडय़ा पदांवर असलेले आयएएस अधिकारी सर्व प्रकारचे कायदे धाब्यावर बसून कर्मचारी आणि स्वयंरोजगारीतांना आंदोलन करण्यास भाग पाडत आहेत, असे राव यांचे म्हणणे आहे.
राव यांच्या मागण्या
* औद्योगिक न्यायालयाने पालिका कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेला निर्णय त्वरीत लागू करावा.
* सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच त्या वेळी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा.
* अजित पवार यांच्या मध्यस्थीने झालेला ‘बेस्ट’चा करार अमलात यावा.
* २८ एप्रिल, २०१२च्या कराराची थकबाकी बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळावी.
* हकीम समितीत म्हटल्याप्रमाणे १ मेपासूनची भाडेवाढ लागू करावी.
* रिक्षा चालक व मालकांच्या सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात भूमिका निश्चित करावी.